प्रतिनिधी/ बेळगाव
वातावरणातील बदलामुळे शहरवासीयांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे कठिण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना महागडय़ा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे अशक्मय आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवून संपूर्ण शहरात सॅनिटायझर फवारणी करावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवकांच्या वतीने महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देण्यात आले.
माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरवासीयांना भेडसावणाऱया समस्यांची माहिती दिली. लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्व क्षेत्रातील नागरिकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना मोठय़ा हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेणे अशक्मय आहे. अशातच मागील 15 दिवसात मोठय़ा प्रमाणात बळींची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे अंत्यविधी करताना देखील अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाबाधितांना औषधोपचार घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये जागा मिळत नाही. तसेच व्हेंटीलेटरची संख्या कमी आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व उपमुख्यमंत्री असलेल्या स्मार्ट शहरात आरोग्याबाबत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तसेच सॅनिटायझर करण्याकडे देखील महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. व्हेंटीलेटर्सची उपलब्धता करून आवश्यक आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. तसेच संपूर्ण शहरात स्वच्छता मोहिम राबवून प्रत्येक वॉर्डमध्ये सॅनिटायझर करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच मालमत्ता धारकांना पीआयडी क्रमांक मिळत नसल्याने घरपट्टी नसताना अडचणी येत आहेत. पीआयडी क्रमांकची विचारणा केल्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे पीआयडी क्रमांक मिळत नसल्यामुळे घरपट्टी भरण्यास अडचण निर्माण झाली आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या ई अस्ती प्रणालीवर नोंद करण्याकरिता विविध कागदपत्राची मागणी केली जात आहे. यापूर्वी घरपट्टी भरलेल्या नागरिकांना पीआयडी क्रमांक देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती आयुक्तांकडे करण्यात आली. पीआयडी क्रमांक देण्यासाठी विभागवार कर्मचाऱयांची नियुक्ती करावी अशी सूचना करण्यात आली. यावेळी निवेदन देताना माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, ऍड. धनराज गवळी, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, जयश्री माळगी, प्रशांत भातकांडे आदी उपस्थित होते.









