प्रतिनिधी/ बेळगाव
अनिष्ट गोष्टींना मागे सारून नव्याचा स्वीकार करण्याची शिकवण देणारा होळीचा सण बेळगाव शहर व परिसरात रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावषी होळीवर कोरोना व आचारसंहितेचे निर्बंध असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने होळी साजरी झाली. पारंपरिक पद्धतीने घरांच्या समोर शेणाच्या गोवऱया पेटवून होळी साजरी करण्यात आली.
बेळगावचा होलिकोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. रविवारी सकाळपासूनच मंदिरांमध्ये पूजन करण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. टिमक्मया वाजवत फिरणारे चिमुकले सर्वत्र दिसून आले. होळी दहन करण्यासाठी लागणारी लाकडे, नारळाची झावळे, शेणाच्या गोवऱया जमा करण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती. होळी मांडून झाल्यानंतर रांगोळी घालून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री उशिरा शहर तसेच उपनगरांमध्ये होळीचे दहन करण्यात आले. यावषी सार्वजनिक होळी साजरी करण्यावर निर्बंध असल्याने नागरिकांनी घरोघरी होळी पेटवून आनंद साजरा केला.
होळी कामाण्णा मंदिरांमध्ये पूजन
शहरात ठिकठिकाणी होळी कामाण्णा मंदिरे आहेत. दोन दिवसांपूर्वीच या मंदिरांची स्वच्छता करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली होती. रविवारी त्या त्या परिसरातील नागरिकांनी विधिवत होळी कामाण्णाचे पूजन केले. यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. परिसरात उभ्या करण्यात आलेल्या होळीचे दहन करण्यात आले.









