प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील परशुरामनगर येथील डॉ. देसाई यांच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये होणाऱया खासगी कोविड सेंटरला नागरिकांचा विरोध कायम आहे. यासाठी नगर परिषदेने संबंधितांना नाहरकत दाखला देऊ नये यासाठी पत्रव्यवहारही केला आहे.
मध्यंतरी येथील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ. सावंत यांनी वरील ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची परवानगी घेतली. मात्र हे सेंटर सुरू होण्याआधीच येथे जाण्यासाठी केवळ 10 फुटाचा रस्ता आहे, सांडपाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. त्यामुळे परवानगी रद्द करावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. यामुळे नागरिकांचा हा विरोध लक्षात घेता फुले यांनी डॉ. सावंत यांना सेंटर सुरू करण्यासाठी नगर परिषदेचा नाहरकत दाखला आणण्याची अट घातली.
त्यामुळे सावंत यांनी हा दाखला मिळावा म्हणून नगर परिषदेकडे अर्ज केला. याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनीही हा दाखला देऊ नये म्हणून नगर परिषदेला पत्र दिले. यानंतर डॉ. सावंत, नगरसेवक शशिकांत मोदी व नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत नागरिकांनी आपला विरोध कायम असून तो कधीही बदलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता नगर परिषद नाहरकत दाखला देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी नागरिकांसोबत- मोदी
याबाबत नगरसेवक मोदी यांनी प्रसिध्दी पत्रक दिले असून त्यात या कोविड सेंटरला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आजपर्यंत मी त्यांच्यासोबत असून यापुढे माझी भूमिका नागरिकांच्या बरोबर असेल असे नमूद केले आहे.









