जीवनावश्यक वस्तुंची जोरदार खरेदी-विक्री
प्रतिनिधी / बेळगाव
भाजी घ्या भाजी….. घ्या स्वस्त इकडं… 100 ला दोन नग… अशा आरोळय़ा देत आपल्या मालाची जोरदार जाहिरात करत आठवडी बाजाराचा लाभ घेणाऱया विक्रेत्यांना कोविड 19 च्या संकटानंतर आता संधी मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाला. परिणामी हजारोंची उलाढाल होणारा आठवडी बाजारदेखील लॉकडाऊन झाला होता. सलग सहा आठवडय़ांनंतर मागील शनिवारी कोरोनाच्या सावटाखाली आठवडी बाजार खुला झाला. सलग दुसऱया शनिवारी तिसऱया टप्प्यातील लॉकडाऊन उठण्यापूर्वी आठवडी बाजार पूर्वीप्रमाणेच बहरला. सामाजिक अंतर राखत मास्क लावून स्वतःची सुरक्षा स्वतःवरच ही जाणीव राखत आठवडी बाजारात जीवनावश्यक वस्तुंची जोरदार खरेदी-विक्री करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सलग सहा आठवडी बाजार निरव शांततेतच गेले. परिणामी हजारोंची उलाढाल ठप्प झाली. बाजाराच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱया विक्रेत्यांवर मोठे संकट कोसळले. मात्र, पुन्हा नव्या उमेदीने उभे राहत आठवडी बाजार बहरला असल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. भाजीपाला, कपडे, कडधान्य, पापड-लोणचे, फळे, चप्पल, इतर शोभेच्या वस्तु, स्टेशनरी साहित्य, बॅग्ज-पर्स, खेळण्याचे साहित्य यापासून जीवनावश्यक साहित्याने बाजारपेठ फुल्ल असल्याचे दिसून आले. यामुळे शांततेतच आणि शुकशुकाटात असलेला आठवडी बाजार पुन्हा एकदा बहरला आहे.
रमजान सणाची किनार
आठवडी बाजारात मुस्लीम बांधवांच्या रमजान सणाच्या निमित्ताने आवश्यक वस्तुंची विक्री करण्यात येत आहे. रमजान महिन्यात रोजा धरला जातो. यामुळे इफ्तारच्या निमित्ताने आवश्यक साहित्य विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. यामुळे आठवडी बाजाराला रमजान सणाची किनार आहे. सुका मेवा, शेव्या तसेच फळे व खजूर तसेच रोजा सोडण्यासाठी तयार करण्यात येणाऱया नाविन्यपूर्ण पदार्थांचे साहित्य आठवडी बाजारात विक्री केले जात आहे. यामुळे कोविड 19 चे संकट असले तरी त्यातून रमजानसाठी आवश्यक साहित्य मात्र बाजारपेठेत दाखल झाले आहे.
चुरमुरे भट्टीत गर्दी
बाजारात विविध साहित्याच्या खरेदीसाठी शहराबरोबरच उपनगरी व ग्रामीण भागात प्रामुख्याने नागरिकांची गर्दी होती. आठवडय़ाच्या भाजीपाल्यापासून इतर सर्व किराणा माल खरेदी केला जातो. शेवटी बाजार करून जाताना भट्टीतील चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, पोहे यांची खरेदी होतेच. लॉकडाऊन काळात सर्व बंद असताना भट्टीदेखील अडचणीत आली. मात्र, आठवडी बाजारात चुरमुरे भट्टीत ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे थांबलेला व्यवसाय जोरदार सुरू झाल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे.
सामाजिक अंतर… मास्क… सॅनियटायझर्स
कोरोनावर मात करण्यासाठी प्रामुख्याने या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागतो. बाजारपेठेत प्रत्येकजण आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्कचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. किराणा मालाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी असून दुकान चालकांकडून सामाजिक अंतर राखत चौकटीत उभा राहून तसेच दोरी बांधून अंतर पाळले जात आहे. यामुळे आठवडी बाजारात अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचे भान राखल्याचे चित्र अनुभवायला मिळत असले तरी दुसऱया बाजूला वाहतुकीची कोंडी, ग्राहक वर्गाची गर्दी यामुळे बाजारपेठ फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.









