ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियाचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 2036 पर्यंत त्याच पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतिन यांनी पदावर कायम राहावं, यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. 7 दिवस चाललेल्या या प्रक्रियेनंतर बुधवारी ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाली.
दरम्यान, 22 एप्रिल रोजीच हे मतदान घेण्यात येणार होते; परंतु कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ते पुढे ढकलण्यात आले. मतदानाची तारीख 1 जुलै ही निश्चित करण्यात आली होती; परंतु मतदान केंद्रे एक आठवडाआधीच उघडण्यात आली. मुख्य मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन पद्धतीनंही जनतेनं मतं नोंदवली आहेत.
या मतदानात सुमारे 98 टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 2036 पर्यंत पदावर ठेवण्यासाठी रशियाच्या जनतेने समर्थन व विरोध दर्शविला. रशियावर दोन दशकांपासून शासन करणा-या 67 वर्षीय अध्यक्ष पुतिन यांचा कार्यकाळ वर्ष 2024 मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीला 78 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला, तर 21 टक्के लोकांनी त्याच्याविरोधात मतदान केलं आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्याचं केबीसी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
रशियात राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. त्यामुळे पुतिन यांना अजून सहा वर्षांच्या दोन टर्म्स पूर्ण होईपर्यंत सत्तेवर राहता येणार आहे. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आता त्यांच्या वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत रशियाच्या अध्यक्षपदावर राहतील.
याचबरोबर सामाजिक लाभ, स्त्री-पुरुष विवाहाची परिभाषा निश्चित करणे व सरकारमधील शक्तीचे वाटप आदी मुद्द्यांची देखील घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तींना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेली होती व पुतिन यांच्या स्वाक्षरीनंतर त्याबाबतचे कायदेही तयार करण्यात आले. घटनादुरुस्तींवर मतदान घेऊन त्याला लोकशाही पद्धतीची मान्यता देण्यात आली आहे.