दर सेकंदाला बदलतो डिझाइन
वेगाने बदलणाऱ्या फॅशनच्या युगात वेगवेगळे ड्रेस खरेदी करणे खर्चिक असते. परतु एकच ड्रेस जर स्वत:चे डिझाइन बदलत असेल तर वारंवार कपडे खरेदी करण्यापासून मुक्ती मिळू शकते. एडोबच्या संशोधकाने ही कामगिरी करून दाखविली आहे. त्याने असा फ्यूचरिस्टिक ड्रेस तयार केला आहे, जो दर सेकंदाला स्वत:चे डिझाइन बदलू शकतो.
या इंटरॅक्टिव्ह ड्रेसची निर्मिती एडोबच्या रिसर्च सायंटिस्ट क्रिस्टिन डिएर्क यांनी केली आहे. त्यांनी एडोब मॅक्स 2023 च्या क्रिएटिव्हीटी कॉन्फरन्समध्ये हा ड्रेस जगासमोर सादर केला आहे. परिषदेवेळी डिएर्क हा ड्रेस परिधान करून पोहोचल्यावर प्रत्येकाची नजर त्यांच्याकडेच वळली होती.
क्रिस्टिन डिएर्क यांचा ड्रेस एक बटन क्लिकवर केल्यावर डिझाइन बदलत असल्याचे पाहून लोक चकित झाले. हा प्रकार क्षणाक्षणाला घडत होता. ड्रेसवरील डिझाइन्स टीव्ही स्क्रीनवर बदलत्या दृश्यांप्रमाणे वाटत होत्या.
डिएर्क यांनी स्ट्रेपलेस गाउनला ‘डिजिटल ड्रेस’ संबोधिले आहे. या ड्रेसमध्ये आणखी अनेक वैशिष्ट्यो आहेत. हा ड्रेस परिधान करणाऱ्यांसोबत चालतो, याचा अर्थ हा ड्रेस परिधान करणारा व्यक्ती ज्या दिशेला जाईल त्यानुसार त्याचे डिझाइन देखील बदलत जाणार आहे. सध्या हा ड्रेस क्रीम कलरपासून मेटालिक सिल्वर रंगात बदलताना दिसून आला आहे. ड्रेसवर क्रिसक्रॉस डिझाइनपासून हीऱ्याचा आकार आणि शेवरॉनसारख्या रेषांसह विविध प्रकारचे पॅटर्न कसे बदलले जाऊ शकतात हे एडोब संशोधकाने दाखवून दिले आहे.









