वृत्तसंस्था/ केपटाऊन
महिलांच्या टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या सामन्यांत न्यूझीलंडने बांगलादेशवर 71 धावांनी, तर चुरशीच्या ठरलेल्या लढतीत वेस्ट इंडिजने आयर्लंडवर 6 गडी राखून विजय मिळविला. केपटाऊनमध्ये न्यूझीलंडने बांगलादेशवर मिळविलेल्या विजयात सुझी बेट्सने शानदार कामगिरी केली. 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकांत 8 बाद 118 पर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडच्या ईडन कार्सनने तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी, बेट्सने नाबाद 81 धावांची खेळी केल्याने न्यूझीलंडला 3 बाद 189 अशी मोठी धावसंख्या उभारता आली. आपल्या या खेळीदरम्यान बेट्स टी20 विश्वचषकात 1000 धावा काढणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. न्यूझीलंडची मॅडी ग्रीन 44 धावांवर नाबाद राहिली, तर बर्नाडाइननेही 44 धावा केल्या.

दुसरीकडे, हेली मॅथ्यूजच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर आयर्लंडवर वेस्ट इंडिजने सहा गडी राखून विजय मिळवला. 138 धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजला अंतिम षटकात सहा धावांची गरज होती आणि शबिका गजनबी (7 चेंडूंत 13 धावा) तीन चेंडू शिल्लक असताना धावचित झाल्यावर आयर्लंड एका ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब करेल असे वाटत होते. पण दोन चेंडूंत दोन धावा आवश्यक असताना मॅथ्यूजने (53 चेंडूंत 66 धावा) लॉरा डेलनीचा फूलटॉस फटकावून वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.
त्यापूर्वी गॅबी लुईस (34 चेंडूंत 38 धावा) आणि ओर्ला प्रेंडरगास्ट (47 चेंडूंत 61 धावा) यांच्या जोरावर आयर्लंडला बऱ्यापैक मजल मारता आली. या निकालाचा परिणाम म्हणजे वेस्ट इंडिज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची धूसर अशी शक्मयता असून त्यांची अंतिम लढत पाकिस्तानविरूद्ध होईल.









