सत्तरी मामलेदारांची माहिती : दरवाजा उघडण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता : तिन्ही महाजन गटांच्या स्वतंत्र बैठका
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी वेळूस रवळनाथ देवस्थानच्या महाजनांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मामलेदार दशरथ गवस यांनी दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. यामध्ये सविस्तर चर्चा केली. दरम्यान, पुढच्या आठवडय़ात बुधवारी(दि. 27) याबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. त्यात देवस्थानचा दरवाजा उघडण्यास संदर्भात निर्णय होणार आहे, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.
सत्तरी वेळुस रवळनाथ देवस्थानच्या महाजनांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर दसरोत्सवाच्यावेळी सरकारला देवस्थानच्या दरवाजाला कुलूप लावावे लागले होते. तेव्हापासून हे देवसस्थान बंद आहे.
वेळूस रवळनाथ देवस्थानाचा दसरोत्सवादिनी गावकर व गुरव या दोन महाजनांच्या गटा दरम्यान वाद निर्माण झाला. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार दशरथ गावस यांनी मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावून हा वाद तात्पुरता त्याठिकाणी मिटविला होता. गावकर समाजाचे पावणाई देवीचे तरंग गुरव महाजन गटाने हाती घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी गावकर समाजाने केली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन मामलेदार दशरथ गावस याने देवस्थानच्या दरवाजाला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काल बुधवारी गावकर गुरव व मडवळ या तिन्ही गटांच्या प्रतिनिधींची वेगवेगळी बैठक मामलेदार कार्यालयात झाली. यावेळी दशरथ गावस यांनी त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी प्रत्येक महाजन गटाला देवस्थानात असलेले धार्मिक अधिकार यासंदर्भात लेखी निवेदन सादर करण्याचे आदेश दशरथ गावस यांनी गावकर गुरव व मडवळ गटाला दिले आहेत. दरम्यान, येत्या बुधवारी (दि. 27 रोजी) या संदर्भाची विशेष सुनावणी होणार असून त्यामध्ये देवस्थानच्या दरवाजाला लावलेले कुलपासंदर्भात निर्णय होणार आहे.
निवडणुकीसाठी विशेष समितीची निवड करणार!
सदर देवस्थान सरकारच्या कायद्यानुसार नोंदणीकृत असल्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देवस्थानाच्या निवडणुका होत असतात. ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत. ही निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका विशेष समितीची नियुक्ती करण्यात येणार असून सदर समितीच्या मार्फत ही निवडणूक घेण्यात आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या बुधवारी देवस्थानची समिती, देवस्थानाची देवस्की व तरंग यासंदर्भात निर्णय देण्यात येणार आहे. स्वतंत्र पद्धतीने घेण्यात आलेल्या विविध महाजन गटांच्या बैठकीला मोठय़ा प्रमाणात महाजनांची उपस्थिती होती.
बुधवारी सर्व गटांची स्वतंत्ररीत्या बैठक घेण्यात आली. त्यांना वेगवेगवेगळय़ा स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक महाजन गटाला असलेले धार्मिक अधिकारांच्या संदर्भात निवेदन सादर करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. दि. 27 रोजी विशेष बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल.
-दशरथ गावस, मामलेदर, सत्तरी.









