सेबीने दिली मंजुरी : एपीआय होल्डिंग्ज, सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीचा समावेश
वृतसंस्था/ मुंबई
शेअर बाजारातील नियामक सेबीने अलीकडेच तीन कंपन्यांच्या आयपीओ सादरीकरणाला मान्यता दिली आहे. यामध्ये एपीआय होल्डिंग्ज, वेलनेस फॉरेवर मेडिकेअर आणि सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीस यांचा समावेश असणार आहे. कंपन्यांनी दाखल केलेले अर्ज मंजूर करण्यात आल्याने येत्या काळात सदरच्या कंपन्यांकडून आयपीओ दाखल केले जातील.
पाहुया तीन कंपन्यांची माहिती-
एपीआय होल्डिंग्ज – गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सेबीकडे कंपनीने आपला अर्ज आयपीओसाठी दाखल केला होता. एपीआय होल्डिंग्जचा आयपीओ 6250 कोटी रुपयांचा असणार आहे. सदरच्या आयपीओच्या मार्फत उपलब्ध होणारे 1929 कोटी रुपये हे कर्ज आणि देणी फेडण्यासाठी केले जाणार आहेत.
वेलनेस फॉरेवर – ओम्नी चॅनेल रिटेल फार्मसी वेलनेस फॉरेवर मेडिकेअर लिमिटेड आपला आयपीओ बाजारात दाखल करणार असून यातून 1500 ते 1600 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत 400 कोटी रुपयांचे नवे इक्वीटी समभाग सादर केले जाणार आहेत. एकंदर 1 कोटी 60 लाख 44 हजार 709 इक्विटी समभाग विक्रीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीस- सदरची कंपनी लवकरच आपला आयपीओ बाजारात दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरच्या आयपीओअंतर्गत कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांकडून 300 कोटी रुपयांचे इक्विटी समभाग सादर केले जाणार असल्याचे समजते. कंपनीतील प्रवर्तक गौरीशंकर अग्रवाल 34.33 लाख इक्वीटी समभागांची विक्री करणार आहेत.
याचप्रमाणे कलावती अग्रवाल 33.45 लाख व मोहन अग्रवाल 30.09 लाख इक्वीटी समभाग विक्री करणार आहेत.









