वेद मंत्राहुन आम्हा वंद्य वंदे मातरम् अशी देशभक्तांची प्रार्थना जणू प्रजासत्ताकदिनी असंख्य देशभक्तांनी गायिली आणि देशाविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी 700 हून अधिक महिलांच्या सामूहीक वंदे मातरम् गायनाचा आविष्कार यामधून प्रकट झाला. याला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच संपूर्ण वंदे मातरम् कशा स्वरूपात आहे याचेही प्रत्यंतर आले.
ज्ञानदा प्ले ग्रुप नर्सरी आयोजित भव्य सामूहिक वंदे मातरम् गायन सोहळा 26 जानेवारी रोजी बी. के. मॉडेल शाळा प्रांगणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर नागराजू होत्या. मुख्य वक्त्या म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहसरकार्यवाहक अलकाताई इनामदार उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर इंदिराजी प्रति÷ानच्या अध्यक्षा विनीता कुलकर्णी व ज्ञानदा प्ले ग्रुप नर्सरीच्या मुख्याध्यापिका वरदा कुलकर्णी होत्या.
महिलांसाठी महिलांनी केलेला सामूहिक वंदे मातरम् गायनाचा हा अनोखा सोहळा बेळगावात पहिल्यांदाच संपन्न झाला. यामध्ये 720 महिलांनी भाग घेतला होता. सामूहिक संपूर्ण वंदे मातरम् गायनासाठी महिनाभर प्रयत्न चालू होता. यावेळी 87 वर्षांच्या आजींनी देखील यामध्ये भाग घेतला होता.
यावेळी अलकाताई इनामदार यांनी वंदे मातरम् चा इतिहास सांगितला. अध्यक्षस्थानावरून बोलताना राजश्री हलगेकर नागराजू यांनी देशभक्तीसाठी महिलांचे पात्र याविषयी विचार मांडले.
या कार्यक्रमाला 3 हजाराहूनही अधिक संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी महिलांकरिता संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचे नाव ज्ञानदा शक्ती टॅगलाईन आओ पुनरनिर्माण करे असे ठेवण्यात आले. ही संघटना महिलांना शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्टय़ा सबलीकरणाच्या प्रयत्नांसाठी कार्य करेल.
यावेळी डॉ. करुणा हेरवाडकर, डॉ. नेहा कुलकर्णी, शोभा लोगो सोनवडेकर, राही कुलकर्णी, गीतांजली सांबरेकर, नयना रायकर आदी महिलांनी भाग घेतला होता. मान्यवरांचा परिचय राही कुलकर्णी यांनी करून दिला. वंदे मातरम् चा एक महिन्याचा प्रवास परिणीता पाटील यांनी मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्पिता झेंडे तर आभार प्रदर्शन करूणा वेर्णेकर यांनी केले.









