ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी देखील चर्चा करणार, अशी माहिती राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, आज रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. वीज बिलाचा प्रश्न कायम आहे. लोकांची बिले कमी झालेली नाहीत. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, त्यासाठीच पाहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रश्न खूप आहेत. राज्यात प्रश्नांची कमतरता नाही, कमतरता आहे ती निर्णय घेण्याची असे म्हणत निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथर कुंथत सरकार चालवता येत नाही. हे सरकारचे धरसोड धोरण आहे अशा शब्दात सरकारवर राज ठाकरे यांनी टीकाही केली.
यासोबतच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दूध दरात वाढ करावी असे सांगत सरकारने या प्रश्नांवर लक्ष घालावे असेही त्यांनी म्हटले आहे.








