प्रतिनिधी / पणजी :
साळगाव कचरा प्रकल्पाच्या विस्ताराला स्थानिक जनतेचा व पंचायतींचा पूर्ण विरोध आहे. तो निर्णय रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रकल्प विस्ताराचा निर्णय 18 फेब्रुवारी 2019 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. तेव्हाचे मंत्री जयेश साळगावकर यांनी त्यास समर्थन दिले आणि कोणताही विरोध दर्शविला नाही. आता ते विस्ताराच्या विरोधा गळा काढून ‘शो’ करत असून हिमंत असल्यास त्यांनी केलेल्या विरोधाचा पुरवा द्यावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रवक्ते यतीन नाईक यांनी आमदार साळगावकर यांना दिले आहे.
पत्रकार परिषदेत श्री. नाईक म्हणाले की, मुळात या प्रकल्पास सुरुवातीपासूनच जनतेचा विरोध होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मंत्री दिलीप परुळेकर यांनी तो प्रकल्प फक्त कळंगुट-साळगाव या दोनच मतदार संघापुरता मर्यादित असल्याचे आश्वासन देऊन प्रकल्प साकारल्यानंतर संपूर्ण गोव्यातून कचऱयाचे ट्रक येऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता विस्ताराला जनतेचा मोठा विरोध आहे, असे नाईक यांनी सांगितले.
विस्ताराला विरोध करणारी पत्रे मुख्यमंत्री, राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत, परंतु त्यानी दखल घेतली जात नाही. परुळेकरांनी प्रकल्प आणला आणि आमदार साळगावकरांनी विस्ताराला मान्यता दिली ही वस्तुस्थिती आहे. आमदार साळगावकर आता जनतेच्या बाजूने असल्याचे दाखवण्यासाठी विस्ताराच्या विरोधात बोलत आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांनी कधीच विरोध केला नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये हा विस्ताराचा निर्णय झाला आणि जुलैमध्ये आमदार साळगावकरांना मंत्रिमंडळावरून हटवण्यात आले. त्या महिन्यांच्या काळात त्यांनी विस्ताराच्या विरोधात एक शब्द काढला नाही, अशी टीका <श्री. नाईक यांनी केली. सरकारने जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो विस्तार रद्दबहाल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.









