लोंगेवाला पोस्टवरून मोदींचा चीन-पाकिस्तानला इशारा : जवानांसोबत दिवाळी साजरी
जैसलमेर / वृत्तसंस्था
विस्तारवादी धोरण ही एक मानसिक विकृती असून संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे वैतागले आहे. विस्तारवादी वृत्ती अठराव्या शतकातील विचार दर्शवते. भारत अशा विस्तारवादाच्या विरोधातील प्रखर आवाज बनल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शनिवारी दिवाळीनिमित्त राजस्थानातील जैसलमेर सीमेवर जवानांसह दीपावली साजरी केल्यानंतर संबोधित करताना ते बोलत होते. या भेटीदरम्यान भारताची भूमिका स्पष्ट करतानाच त्यांनी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना थेट इशाराही दिला आहे. तसेच जगातील कोणतीच ताकद आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमांची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नसल्याचे मोदी म्हणाले.
भारत कधीही आपल्या हितांच्या विरोधात कुठल्याही किंमतीवर तडजोड करणार नाही हे संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. सैनिकांच्या शक्ती आणि पराक्रमामुळे भारताची शान आणि उंची टिकून आहे. सुरक्षा दलांनीच देशाला सुरक्षित ठेवले असून आज भारत जागतिक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडू शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेले असले आणि जागतिक समीकरणे कितीही बदलली असली तरी सतर्कता हाच सुरक्षेचा मार्ग आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही, असेही मोदी म्हणाले. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, लष्करप्रमुख नरवणे, हवाईदल प्रमुख चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सैन्यासाठी उत्पादन करण्यास पुढे येण्याचे आवाहनही केले. संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्याची प्रक्रिया जलद करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जवानांमुळे देशात उत्सव
देशाच्या सीमेवर जवान भक्कमपणे उभे असल्यामुळे आपला देश आनंदाने सण आणि उत्सव साजरे करू शकतो. जवानांशिवाय माझे दिवाळी साजरी करणे अपूर्ण आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी त्यांनी 1971 साली पाकिस्तानसोबत लोंगेवाला येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाचीही आठवण काढली. भारताच्या जवानांनी येथे इतिहास लिहिला आहे. भारतीय सैन्यासमोर कोणतीही ताकद टिकाव धरू शकणार नाही हे या युद्धाने दाखवून दिले आहे. लोंगेवाला येथील युद्धाला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. संपूर्ण देश शूरवीरांच्या गाथा ऐकून अभिमान व्यक्त करेल. आपल्या शूरवीरांचा भारतमातेलाही अभिमान आहे, असे म्हणत मोदींनी देशसेवेत असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
…तर चोख प्रत्युत्तर मिळेल !
पंतप्रधानांनी लोंगेवाला पोस्टवरून बोलताना पाकिस्तान आणि चीनला कडक शब्दात इशारा दिला आहे. कोणीही हल्ल्याचा प्रयत्न केला तर त्यांना कठोर उत्तर मिळेल. भारताकडून याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारत शत्रूच्या घरात घुसूनही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो, असे ते म्हणाले.
त्रिसूत्रीचा अवलंब करा!
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात तीन विनंत्या केल्या. ‘मी तीन गोष्टींची विनंती करतो. प्रथम, जीवनाचा एक भाग काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची सवय लावा. माझी दुसरी विनंती खूप महत्त्वाची आहे, योगाला प्रत्येक परिस्थितीत जीवनाचा एक भाग बनवा. तिसरी म्हणजे मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा शिका, ती नवीन ऊर्जा निर्माण करेल.’ असेही प्रतिपादन मोदींनी केले आहे.









