प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प परिसरात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळल्याने संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसर निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा परिसर सीलडाऊन करण्यात आल्याने नागरिकांना घरोबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. यामुळे विविध संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमार्फत परिसरातील दोनशे कुंटुंबांना रेशनधान्य पुरवठा करण्यात आला.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीही कॅन्टोन्मेंट परिसरामधून दिल्लीला गेलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसराला सीलडाऊन करून तीन किलोमीटरचा परिसर निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. रहिवाशांना लागणारे जीवनावश्यक साहित्य घेण्यासाठी ठराविक वेळेची मुभा देण्यात येत आहे. अन्यथा नागरिकांना फिरता येत नाही. वीस दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असंख्य नागरिकांकडील रेशनधान्याचा साठा संपुष्टात आल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र गरीब नागरिकांकडे पैशाची चणचण आणि जीवनावश्यक साहित्याचा तुटवडा भासत असल्याने त्यांच्या मदतीला काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे कमांडंट ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी एमएलआयआरसीच्यावतीने विविध साहित्य दिले आहे. जयभारत फौंडेशन, पेडाई, शिवकांत सिदनाळ, पिंक स्टेप्सच्या मयूरा शिवलकर, शालाना बत्तर आदींनी विविध साहित्य दिले. सदर साहित्य कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डही गरजू आणि गरिबांच्या मदतीला धावून आले आहे. सदर साहित्याचे वितरण कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्चस्वा, अभियंते सतीश मण्णूरकर, कार्यालय अधीक्षक एम. वाय. ताळूकर आदींसह कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
15डीआय-35, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्चस्वा
कॅम्प परिसरातील 300 कुटुंबांना रेशनधान्य आणि दैनंदिन लागणारे साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिना पुरेल इतके साहित्य देण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील रेशन वितरकांकडून बीपीएल रेशनकार्डधारकांची यादी घेऊन सदर कुटुंबांना रेशनधान्य व साहित्य घरपोच देण्यात येत असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्चस्वा यांनी दिली.









