प्रतिनिधी /म्हापसा
सध्या जो म्हापसा पालिकेत कर आकारला जातो तो इतर पालिकेच्या तुलनेत खुपच कमी आहे. म्हापसापेक्षा डिचोली पालिकेचा कर जास्त आहे. शहरात अपेक्षित विकास साधायचा असल्यास महसुलाची गरज भासते यामुळे म्हापसा पालिकेच्या पहिल्याच नवनिर्वाचित मंडळाच्या पालिका बैठकीत विविध करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा पालिकेची पहिली बैठक पार पडली. यावेळी आमदार जोशुआ डिसोझा, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर आदी नगरसेवक उपस्थित होते. निवासी दुरुस्तीच्या परवानगीचे शुल्क हे अडीच हजारावरून 5 हजार तर व्यावसायिक शुल्क हे 15 ते 20 हजारापर्यंत वाढविण्याचा निर्णय तर तात्पुरता गाळे मालकाकडून 11 महिन्यांसाठी भाडे 4 हजारांवरून थेट 11 हजार, तात्पुरता जोडणी 3 हजार, सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत जोडणी 5 हजार करण्याचे ठरविले आहे.
त्याचप्रमाणे निवासी फ्लॅट्सचे भोगवटा शुल्क 15 हजारापर्यंत, तर दुकान व कार्यालयांसाठी 15 हजार शुल्क, बंगला किंवा घरासाठी 10 हजारपर्यंत शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे. पालिकेला उत्पन्न मिळावे याकरीता हा निर्णय आहे. इतर पालिकांच्या तुलनेत म्हापसा पालिकेचा हा कर खुपच कमी आहे. त्यामुळे डिचोली पालिकेचे दर नजरेसमोर ठेवत म्हापसा पालिकेने हे कर निश्चित करण्याचे ठरविल्याचे नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले.
काही नगरसेवकांनी थेट अशा पद्धतीने दर वाढविणे योग्य नसल्याचे सांगितले. परंतु मागील अनेक वर्षे पालिकेने कुठलाच कर वाढविलेला नाही. त्या अर्थाने हे करवाढ योग्य असल्याचे नगराध्यक्षांनी मंडळाला पटवून दिले व चर्चेनंतर हे विविध कर निश्चित केले गेले. नगरसेवक सुधीर कांदोळकर, शशांक नार्वेकर, आनंद भाईडकर, प्रकाश भिवशेट, साईनाथ राऊळ, आशीर्वाद खोर्जुवेकर, तारक आरोलकर, कमल डिसोझा आदींनी यात प्रामुख्याने सहभाग घेतला.
शौचालये भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय
त्याशिवाय म्हापसा मार्केटमधील शांतादुर्गा हॉटेलनजीक असलेले शौचालय हे ‘आनंद सेवा संघ’ या संस्थेला 20 ते 25 वर्षे भाडेतत्वावर देखभालीसाठी देण्याबाबत निर्णय झाला. ही संस्था या शौचालयाची सर्व देखरेख करेल व पालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. हा प्रस्ताव उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांनी मांडला. सुरुवातीला हे लीज 30 वर्षांसाठी असावे असे सांगण्यात आले. परंतु 30 वर्षे जास्त होत असल्याने नंतर तो 25 वर्षापर्यंत केला गेला. या संस्थेला शौचालयाची देखभाल देताना पालिकेने या संस्थेची योग्य माहिती गोळा करून नंतरच करार करावा अशी सूचना प्रकाश भिवशेट यांनी केली.
बेकायदा गाळे थाटल्यास न्यायालयात जाणार- नगरसेविका कमल डिसोझा यांचा इशारा
कोमुनिदादच्या जागेत काही नगरसेवक आपल्या मर्जीतील काही बिगर गोमंतकीयांना गाळे घालण्यासाठी परवानगी देतात हे बेकायदेशीर आहे. आपली वोटबँक सांभाळण्यासाठी हे कृत्य केले जाते. यापुढे असे बेकायदेशीर गाळे थाटण्यासाठी परवानगी दिल्यास आपण पालिकाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा यावेळी नगरसेविका कमल डिसोझा यांनी दिला. दरम्यान काही रोजंदारी कामगार नियमित कामाला येत नाही त्यांना कामावरून कमी करण्याची मागणी नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी केली. मागील 3 महिन्याची हजेरीपट तपासून त्याची सरासरी काढावी. कामगारांचा आाsरग्य भत्ता 50 रुपयांनी वाढविण्यापेक्षा कामगारांचे व त्यांचा कुटुंबियांचा विमा उतरण्याची मागणी त्यांनी केली. कचरा उचल गाडीवर नवीन 6 चालक घेण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.









