गावापासून दूर असलेल्यांना मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था
प्रतिनिधी / कणकवली:
लॉकडाऊनमुळे मूळ गावापासून इतरत्र अडकलेल्या स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना अटी-शर्तींच्या अधिन राहून मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. जे नागरिक ग्रीन व ऑरेंज झोनमधून जिल्हय़ात येतील, त्यांना 28 दिवस होम क्वारंटाईन, तर वेळोवेळी घोषित केलेल्या हॉटस्पॉट क्षेत्रातून येणाऱयांना गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण 14 दिवस व त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय नियंत्रण समितीचे अध्यक्ष सरपंच असणार असून संबंधीत गावचे तलाठी सहअध्यक्ष असणार आहेत. सदस्य म्हणून विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचत गट ग्रामसंघ अध्यक्षा, महिला बचत गट सचिव, पोलीस पाटील तसेच सरपंच यांनी नियुक्त केलेले दोन ग्रा.पं. सदस्य असणार आहेत.
ग्रामस्तरीय नियंत्रण समितीने गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण कक्षाकरिता आवश्यक सेवा सुविधांची व्यवस्था होईल, अशी इमारत तयार करून ठेवावी. बाहेरून गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींची नाक्यावर वैद्यकीय तपासणी झाली आहे, याची खात्री करावी व नंतरच या व्यस्तीस घरी अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवायचे आहे. समितीने ज्या लोकांना संस्थात्मक विलगीकरण केलेले आहे, त्यांची राहण्याची व इतर आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करायची आहे. संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची दैनंदिन आरोग्य तपासणीची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राची असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची व्यवस्था त्वरित सीसीसी, डीसीएच अथवा डीसीएचसी येथे करावी. कोरोनाशिवाय इतर तातडीच्या उपचारांची गरज असल्यास तालुका आरोग्य अधिकाऱयांच्या संदर्भाने त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करायचे आहे. संस्थात्मक वा गृह विलगीकरणमधील व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत, याची जबाबदारी ग्रामस्तरीय नियंत्रण समितीची असणार आहे. याचे कुणी उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करावी. यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.









