प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून सोमवारपासून विमानवाहतुकीला प्रारंभ झाला. परंतु दुसऱयाच दिवशी या विमानसेवेला ग्रहण लागले. मंगळवारी स्टार एअरची बेळगाव-अहमदाबाद-बेळगाव ही फेरी अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही फेरी का रद्द केली याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
मंगळवारी हैद्राबाद-बेळगाव-हैद्राबाद ही स्पाईस जेट कंपनीची विमानफेरी झाली. हैद्राबादवरून हे विमान सायंकाळी 5.25 वा. बेळगावला आले. यामध्ये एकूण 13 प्रवासी होते. तर 5.55 वा. हैद्राबादकडे निघालेल्या विमानामध्ये एकूण 24 प्रवासी होते. दिवसभरात हे एकच विमान बेळगावच्या सांबरा विमानतळावर आले.
आज बेंगळूर व बेळगाव फेरी सुरळीत
बुधवारी दुपारी 3.45 वा. स्टार एअरचे विमान बेळगावहून बेंगळूरला जाणार आहे. सायंकाळी स्पाईस जेट कंपनीने विमान 5.25 वा. हैद्राबादवरून बेळगावला येणार आहे. सायंकाळी 5.55 वा. पुन्हा हे विमान हैद्राबादला जाणार आहे.
विमान प्रवासासाठी ई-पास गरजेचाच
कोणत्याही आंतरराज्य विमानसेवेसाठी कर्नाटक सरकारने ई-पास गरजेचा केला आहे. प्रवासापूर्वी किमान 4 दिवस आधी सेवा सिंधू ऍपमध्ये नोंदणी आवश्यक आहे. ई-पास असेल तरच विमानप्रवास करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ई-पास घ्यावा, असे आवाहन बेळगाव विमानतळ प्रशासनाने केले आहे.









