सिंधुदुर्ग विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न पूर्णत्वाच्या मार्गावर : खासदार विनायक राऊत यांची माहिती
जानेवारीच्या तिसऱया आठवडय़ात सत्तर प्रवाशांना घेऊन विमान येणार
उद्घाटनापेक्षा प्रवासी वाहतूक सुरू करण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर!
प्रतिनिधी / परुळे:
चिपी-परुळे येथे साकारत असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 20 जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी बूकिंग सुरू होणार आहे. मुहुर्ताचे प्रवासी विमान 70 प्रवाशांना घेऊन जानेवारीच्या तिसऱया आठवडय़ात मुंबईहून सिंधुदुर्गात दाखल होणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.
दिल्लीहून नागरी विमान उड्डाण संचालक जनरल (डीजीसीए) समिती दहा जानेवारी रोजी दाखल होईल. वीस जानेवारीपर्यंत पेंद्राची परवानगी मिळेल. परवानगी मिळाल्यानंतर दुसऱया दिवशी तिकीट बूकिंग सुरू होईल. तसेच एअरलाईन्स विमान वाहतूक कंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग अशी वाहतूक सुरू होईल. त्यानंतर इंडिगोच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणी प्रवासी वाहतूक प्रस्तावित असल्याची माहिती देताना विमानतळाच्या उद्घाटनाला कोण मान्यवर येणार, यापेक्षा सर्वसामान्यांना हा विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. या अगोदर बरीच उद्घाटने झाली आहेत. त्यामुळे आता उद्घाटनापेक्षा प्रवासी वाहतूक सुरू करण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर असल्याचे राऊत म्हणाले.
चिपी विमानतळ येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विमानतळ सुरू करण्यासंदर्भात खासदार राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत चिपी येथे बैठक घेण्यात आली. ‘आयआरबी’चे राजेश लोणकर, जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, जि. प. सदस्य सुनील म्हापणकर, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश परब, पंचायत समिती माजी सदस्य अतुल बंगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, चिपी सरपंच गणेश तारी, परुळे उपसरपंच विजय घोलेकर, महावितरणचे अधिकारी लोकरे, बीएसएनएलचे अधिकारी देशमुख, आयआरबीचे अमर पाटील, एकनाथ सपकाळ तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
इंटरनेट कनेक्शनसाठी 24 लाख जमा करणार
आयआरबीच्यावतीने लोणकर यांनी इंटरनेट कनेक्शनसाठी तात्काळ 24 लाख रु. बीएसएनएलकडे जमा केले जातील, असे सांगितले. बीएसएनएलचे देशमुख म्हणाले, वेंगुर्ले-म्हापणöपरुळेमार्गे कनेक्शन देण्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पण पैसे भरले नव्हते. तसेच आता त्यात राऊटर आवश्यक असल्याने हे काम जरा उशिरा सुरू झाले. मात्र, येथील कनेक्टिव्हीटीमध्ये खंड पडणार नाही, असे ते म्हणाले.
अपुरी कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना
महावितरणच्या अधिकाऱयांनी सांगितले, अकरा केव्ही वीजपुरवठा करण्यात आला आहे. आवश्यक असल्यास 33 केव्ही वीजपुरवठा कुंभारमाठवरून करण्यात येईल. खासदार व आमदारांनी एटीसी टॉवरचीही पाहणी केली. केंद्रातील अधिकारी या टॉवरमध्ये अत्याधुनिक सिस्टीम बसवत असून या कामाबाबत माहिती घेतली. त्यानंतर प्रवासी टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करून अपुरी कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुरक्षे संदर्भातील प्रस्तावाला लवकर मंजुरी द्यावी!
विमानतळ सुरक्षिततेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर मोबाईलवर चर्चा केली. विमानतळ सुरक्षेसंदर्भात पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.