बेळगावचा क्रमांक आता राज्यात चौथ्या क्रमांकावर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावरून अनेक विमानसेवा बंद झाल्याचा परिणाम प्रवासी संख्येवर होत आहे. डिसेंबर महिन्यात केवळ 20 हजार 578 प्रवाशांनी बेळगावमधून विमानप्रवास केला. प्रवासी संख्येची घसरण विमानतळावरील प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या विविध व्यावसायिकांनाही बसू लागला आहे. ही बाब बेळगावच्या विकासासाठी चिंताजनक असून उद्योग, व्यवसाय, उद्योजकांसाठी डोकेदुखीची ठरू लागली आहे.
विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच डिसेंबर महिन्यातील प्रवासीसंख्या जाहीर केली. कर्नाटकात तिसऱ्या क्रमांकावर असणारे बेळगाव यावेळी मात्र चौथ्या स्थानी गेले आहे. विमाने नसल्याने प्रवाशांनी पाठ फिरविली असून याचा फायदा शेजारील हुबळी विमानतळाला होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात 22 हजार 149 असणारी प्रवासी संख्या डिसेंबर महिन्यात 20 हजारांवर पोहोचली. एकेकाळी 40 हजारांहून अधिक प्रवासी बेळगावमधून प्रवास करत होते. प्रवासी संख्या निम्यावर आल्याने यावर आधारलेल्या व्यावसायिकांची धाकधूक सुरू झाली आहे.
विमान प्रवाशांमुळे टॅक्सी, रिक्षाचालक, स्टॉलधारक, कुरिअर, हॉटेल व्यावसायिक या उद्योगांना फटका बसला आहे. बेळगाव रेल्वेस्थानक ते विमानतळापर्यंत सुरू करण्यात आलेल्या रेल टू एअर या बससेवेलाही फटका बसला आहे. मागील वर्षभरात 12 हून अधिक शहरांना विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे बंद झालेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून जोरदार मागणी होत असली तरी राजकीय इच्छाशक्ती अभावी विमानसेवा धोक्यात सापडली आहे.
डिसेंबर महिन्यातील प्रवासीसंख्या-
शहराचे नाव प्रवासी संख्या
बेंगळूर 2744182
मंगळूर 117104
हुबळी 34971
बेळगाव 20578
म्हैसूर 14442
गुलबर्गा 6995









