आमदार नीतेश राणेंच्या ट्विटवरून राजकीय वाद : चिपीतून विमानोड्डाणाला 26 जानेवारीचा मुहुर्त?
- बाळासाहेब आजही आमचे दैवत – आमदार राणे
- नाव देण्याचे अगोदरच ठरलंय – आमदार केसरकर
- गद्दारांच्या तोंडी बाळासाहेबांचे नाव शोभत नाही – आमदार नाईक
- फुकाचे श्रेय लाटण्यासाठी राणे कुटुंबियांची धडपड – शिवसेना
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
येत्या 26 जानेवारी रोजी मुहुर्ताच्या तयारीत असलेल्या चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असे ट्विट भाजप आमदार नीतेश राणे यांनी आपल्या ट्विटरवरून करताच सिंधुदुर्गातील राजकीय वर्तुळात जोरदार गरमागरमी सुरू झाली आहे. चिपी विमानतळ हा राणे साहेबांचा ड्रिम प्रोजेक्ट असून बाळासाहेब ठाकरे हे आम्हा राणे कुटुंबियांचे आजही दैवत आहेत. त्यामुळे या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असे आपले वैयक्तिक मत आमदार नीतेश राणे यांनी ट्विटद्वारे व्यक्त केल्यानंतर शिवसेना गोटातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.
दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्या या ट्विटचे स्वागत केले असले, तरी माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या या ट्विटचा खरपूस समाचार घेत गद्दारांना बाळासाहेबांचं नाव देखील घेण्याचा अधिकार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे विमानाच्या उड्डाणापेक्षाही चिपी विमानतळाच्या नामकरणावरून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.
बाळासाहेब आजही राणे कुटुंबियांचे दैवत – नीतेश राणे
आपल्या या ट्विटबद्दल तरुण भारतशी बोलताना आमदार राणे म्हणाले, बाळासाहेब आजही आम्हा कुटुंबियांना दैवतासारखे आहेत. चिपी विमानतळ राणे साहेबांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. आम्ही सत्तेत असो वा नसो, हा विमानतळ राणे साहेबांनी आणला, हे साऱया जनतेला माहीत आहे. या ड्रिम प्रोजेक्टला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचं नाव द्यावं, असं आपलं वैयक्तिक मत मी ट्विटरवरून व्यक्त केलं. हे मत व्यक्त करण्यापूर्वी आपण राणे साहेबांशी चर्चादेखील केली. पक्षाच्या कामाव्यतिरिक्त आपण वैयक्तिक मतही व्यक्त करू शकतो. हे मत आपण वैयक्तिकरित्या व्यक्त केले असले, तरी त्यास आमच्या कुटुंबातील कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. कारण बाळासाहेब हे आमचे सर्वांचेच दैवत आहेत. अलिकडे शिवसेनेला बाळासाहेबांच्या नावापुढे असलेल्या हिंदू हृदयसम्राट या उपाधीचा विसर पडला आहे. आमची मागणी अशी आहे की, या विमानतळाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असंच नाव दिलं जावं, असे ते म्हणाले.
गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही – आमदार वैभव नाईक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले, त्याचवेळी सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. चिपी विमानतळाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाणार आहे. त्यामुळे नीतेश राणेंनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा मुळीच अधिकार नाही, अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आमदार राणेंच्या ट्विटवर केली आहे.
शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब व शिवसेना पक्षाला त्रास देण्याचे काम राणे कुटुंबियांनी केले आहे. शिवसेना संपविण्याची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. मात्र शिवसैनिकांनी टोकाचा संघर्ष करीत राणेंचे सगळे वार परतून लावले. त्यानंतर शिवसैनिकांनी राणेंची काय अवस्था केली, याची जाणीव राणेंना आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेऊन आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा राणे कुटुंबियांचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. आता चिपी विमानतळ पूर्ण होत असताना त्याचे श्रेय लाटण्याचा राणेंचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु, सिंधुदुर्गच्या जनतेसमोर खोटेनाटे चालत नाही, याची जाणीव राणेंनी ठेवावी, अशी प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी व्यक्त केली.
आमचं अगोदरच ठरलय – आमदार दीपक केसरकर
चिपी विमानतळ हा राणेंचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असला, तरी राणेंना आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत या विमानतळाच्या विकासाचा एक साधा दगड देखील लावता आला नाही. विमानतळाचे भूमिसंपादन त्यांच्या काळात झाले. परंतु, याच भूमिसंपादनात नको असलेल्या जमिनीच्या सातबारावरसुद्धा पेन्सिल शेरे मारायला लावत त्यांनी भूसंपादनाचाही घोळ घालून ठेवला. त्यामुळे या प्रोजेक्टचे काम अनेक वर्षे लांबले. शिवसेना सत्तेवर येताच येथील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम खऱयाअर्थाने मार्गी लावण्यात आले. आपण पालकमंत्री असताना हे विमानतळ पूर्णत्वास नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी आणला आणि त्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून चालनाही दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे आणि त्याचे फुकाचे श्रेय राणे कुटुंबीय घेऊ पाहत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
ज्या राणे कुटुंबियांनी जाहीरपणे ठाकरे कुटुंबियांवर अनेक खोटेनाटे आरोप केले, बाळासाहेबांना मानसिक त्रास दिला, शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केले, त्या राणे कुटुंबियांच्या तोंडी ‘बाळासाहेब हे आपले दैवत आहे’, असं म्हणणं ही चेष्टा वाटते. चिपी विमानतळाला बाळासाहेबांचंच नाव देणार, हे केव्हाच ठरलं आहे. त्यामुळे नीतेश राणेंचे ट्विट गांभिर्याने घेण्याची गरज नाही, असेही आमदार केसरकर यांनी सांगितले.
एकूणच जसजसा चिपी विमानतळ उद्घाटनाचा दिवस जवळ येत आहे, तसतसे विमानतळाच्या श्रेयवादाचे राजकारण अधिकाधिक गरम होत चालले आहे. आमदार राणे यांच्या एका ट्विटने याला वाचा फुटली असून उलटसुलट प्रतिक्रियांनी सिंधुदुर्गचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे.