पोलिसांची कारवाई : सम्राट अशोक चौकात गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, शहर परिसरात विनाकारण बाहेर फिरणाऱया वाहनधारकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सम्राट अशोक चौकात सोमवारी दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा वाढली होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. शिवाय विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, अत्यावश्यक गोष्टीसाठी सकाळी 6 ते 10 या वेळेत बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी दिवसभर शहरात फिरणाऱया वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वातावरणात बदल झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटलकडे नातेवाईकांच्या फेऱया वाढल्या आहेत. शिवाय अत्यावश्यक गोष्टींमध्ये मोडणाऱयांची संख्या अधिक आहे. काही जणांकडे पास आहेत. मात्र काहीजण विनाकारण फिरताना निदर्शनास येत आहेत. पोलीस अशांची अडवणूक करून चौकशी करत आहेत. विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांची वाहने जप्त केली जात आहेत.
दरम्यान, शहराच्या चौकाचौकात असलेल्या पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक करून कसून चौकशी केली जात आहे. शिवाय वाहनधारक कोठे जाणार व कोणत्या कामासाठी जाणार याची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून वाहनांच्या नंबरची नोंद ठेवली जात आहे.









