प्रतिनिधी / बेळगाव
विनय वेंकटेश याळगी आज 81 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याळगी कुटुंबीयांमध्ये स्व. गोविंदराव, कृष्णराव व जीवनराव याळगी हे याळगी कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांचा प्रभाव विनय याळगी यांच्यावर नेहमीच राहिला.
आई स्व. कमलाबाई, वडील स्व. नानासाहेब यांच्या संस्कारात ते मोठे झाले. ते मूळचे बेळगावचेच. शिक्षण संपल्यानंतर विद्युत महामंडळामध्ये साहाय्यक कार्यकारी अभियंते म्हणून 12 वर्षे त्यांनी काम केले. पुढे 1975 मध्ये इलेक्ट्रिक कंत्राटदार म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एलईसीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. भारत फोर्ब्ज, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स व क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपन्यांचे सबकंत्राटदार म्हणून त्यांनी काम पाहिले. बेळगावच्या उद्योग विश्वात त्यांनी 2002 मध्ये फौंड्री सुरू केली व मोटर्स निर्मिती करून क्रॉम्प्टन ग्रीव्हजला वेळोवेळी पुरवठा केले. सीमाप्रश्न सुटावा यासाठी त्यांची धडपड कायम आहे. म. ए. समितीचे ते सक्रिय सभासद आहेत. स्व. बॅ. नाथ पै, स्व. मधु दंडवते, स्व. भाऊसाहेब बांदोडकर, स्व. बाबुराव ठाकुर यांचा सहवास त्यांना बराचकाळ लाभला. आजही किरण ठाकुर यांच्याशी त्यांचा स्नेह आहे. लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रारंभीच्या काळात काम केले आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती स्व. राजेंद्र प्रसाद पूर्वी बेळगावला याळगींच्या घरी आले, तो सोहळा त्यांनी जवळून पाहिला होता. आपण कृतकृत्य झालो ही त्यांची भावना कायम आहे. आज कोरोनाकाळातही सध्या ते रहात असलेल्या अपार्टमेंटच्या सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आपण तृप्त आणि समाधानी आहोत, असे सांगतानाच बेळगावचे आद्यस्वातंत्र्यसेनानी स्व. गोविंदराव याळगी यांचे बेळगावमध्ये बेळगावकरांकडूनच स्मारक उभे राहणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. स्वातंत्र्यलढय़ातील याळगी कुटुंबाचे योगदान नेहमीच बेळगावकरांच्या स्मरणात असणार आहे. थोरांचे आशीर्वाद व मित्र परिवाराच्या शुभेच्छा हेच आपले संचित आहे, असे ते मानतात.









