मतदान करताना आकडे लिहा अक्षरे नको, जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक एजंटांनी मार्गसुचींची काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, खबरदारी घेत नियमानुसार काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी केले आहे.
शनिवारी निवडणूक मार्गसुचींसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, उमेदवारांच्या एजंटांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करु नये. निवडणूक मार्गसुचींसंबंधी माहिती घेवून नियमानुसार काम करावे.
मतदान करताना कोणती खबरदारी घ्यावी या विषयीही जाणिव करुन देण्यात आली आहे. मतपत्राबरोबर निवडणूक अधिकारी जे पेन देतात त्याच पेनचा मतदानासाठी वापर करावा. इतर पेनांचा वापर करु नये, मतदान करताना निवडणूक अधिकाऱयांनी दिलेल्या पेनाऐवजी इतर पेनाचा वापर केल्यास ते मत बाद ठरणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
ज्यांना पहिले प्राधान्याचे मतदान करायचे आहे त्याच्या नावासमोर 1 असा आकडा लिहावा. एका मतपत्रावर पहिल्या क्रमांकाचे मत एकच घालता येणार आहे. एकदा एक लिहिल्यानंतर दुसऱयाच्या नावासमोर पुन्हा एक हा आकडा लिहू नये. रिंगणातील उमेदवारांची संख्या कितीही असली तरी एका मतदाराला पहिले व दुसरे प्राधान्याचे मत घालता येणार आहे.
1 आणि 2 प्राधान्य क्रमांकाच्या मतदानानंतर उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर 3, 4 असे प्राधान्यचे क्रमांक लिहिता येणार आहे. एका उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच आकडा लिहिला जावा. एकच आकडा इतर उमेदवारांच्या नावासमोरही लिहू नये, याची काळजी घ्यावी. प्राधान्य क्रमानुसार मतदान करताना आकडे लिहिले जावेत. एक, दोन अशी अक्षरे लिहू नयेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
मतदानासाठी आकडे लिहिताना कन्नड, इंग्रजी किंवा रोमन आकडे लिहिता येणार आहेत. भारतीय राज्य घटनेच्या आठव्या परीछेदात मान्य करण्यात आलेले भारतातील कोणत्याही भाषेतील आकडे लिहिता येणार आहे. मतपत्रिकेवर मतदाराचे नाव, हुद्दा लिहू नये. सही करु नये, अंगठाही दाबू नये. जर असे प्रकार घडल्यास ते मत बाद ठरणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी मार्गदर्शन केले.
सहाय्यक नेमण्याची तरतूद
अंध, दिव्यांग, निरक्षर मतदारांनी मतदान करण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक करण्यास अवकाश आहे. अशा मतदारांनी 6 डिसेंबरच्या आत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी, आयुक्त, ग्राम पंचायतींच्या पिडीओंनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंध, दिव्यांग, निरक्षक मतदारांसाठी मदत करण्यासाठी सहाय्यकाची गरज आहे, याची खातरजमा करावी, असे जिल्हाधिकाऱयांनी सुचित केले. यावेळी अप्परजिल्हाधिकारी डॉ. शंकराप्पा वनक्मयाळ, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांच्यासह उमेदवारांचे एजंट उपस्थित होते.









