प्रतिनिधी/ पणजी
राज्य विधानसभेचे पाच दिवशीय अधिवेशन आज 3 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. 6 रोजी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मांडतील. या अधिवेशनात म्हादई, नागरिकत्व कायदा, मायनिंग, कायदा सुव्यवस्था, अमलीपदार्थ, बेरोजगारी हे विषय गाजणार आहेत. विरोधी काँग्रेस पक्षाने मगो व गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांच्या सहकार्याने सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे.
पाच दिवसीय अधिवेशनाची तयारी सरकारने आणि विरोधी पक्षानेही केली आहे. विरोधकांना समर्पक उत्तरे देण्याबाबत सरकारने तयारी केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सरकारने विविध घटकांकडून सूचना मागविल्या होत्या. विविध खात्यांचे अधिकारी, मंत्री, आमदार यांच्यासोबतही मुख्य़मंत्र्यांनी बैठका घेतल्या.
म्हादईचा मुद्दा विधानसभेत गाजणार
यावेळी विधानसभा अधिवेशन म्हादईच्या मुद्यावरुन गाजणार आहे. म्हादईवरुन सरकारला घेरण्याची तयारी विरोधी काँग्रेस पक्षासह, मगो आणि गोवा फॉरवर्डने केली आहे. म्हादईच्या मुद्याचे आयते कोलीत विरोधी पक्षांच्या हाती सापडले आहे. केंद्र सरकारने कर्नाटकला दिलेली मान्यता आणि गोवा सरकारचे धोरण या मुद्यावरुन सरकारला अडचणीत आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
नागरिकत्व कायद्यावरुनही सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. नागरिकत्व कायद्यावरुन सरकारला अडचणीत आणण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. त्याचबरोबर खाणबंदी, कायदा सुव्यवस्था, अमलीपदार्थ या मुद्यांवरुनही सरकारला विरोधक अडचणीत आणण्याच्या तयारीत आहेत.
दिगंबर, विजय, सुदिन आक्रमक बनण्याची शक्यता
विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व मगो आमदार सुदिन ढवळीकर आक्रमक बनण्याची शक्यता आहे. म्हादईचा मुद्दा हे तिन्ही नेते प्रभावीपणे मांडण्याच्या तयारीत आहेत. विजय सरदेसाई सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. अपक्ष आमदार रोहन खंवटेही आक्रमक बनण्याची शक्यता आहे.









