प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथे चालणाऱया एका खासगी स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱया विद्यार्थिनीचा शाळेच्या मुख्याध्यापिका, चेअरमन यांनी मानसिक छळ चालविला असल्याची लेखी तक्रार त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे.
दरम्यान या घटनेनंतर त्या शाळेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या इन गोवा वृत्तवाहीनीचे म्हापसा प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांचा पॅमेरा हिसकावून घेत त्याच्या स्कूटरची चावी, डिकीमधील कागदपत्रे ओळखपत्रे त्या स्कूलच्या मुख्याध्यापिका, चेअरमन व शिक्षक वर्गांनी काढून घेण्याची घटना बुधवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे स्कूलच्या व्यवस्थापन मंडळाने घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना दिल्यावर साध्या वेषात जाऊन डय़ुटीवरील पोलिसांनी त्या वृत्तांकन करण्यास गेलेल्या प्रतिनिधीला हाताला पकडून जीपमध्ये बसवून म्हापसा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पत्रकाराला अशाप्रकारे गैरवागणूक दिल्याबद्दल बार्देश तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी निषेध व्यक्त करीत संशयित पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा शहरापासून सुमारे 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खासगी हायस्कूलमध्ये ही विद्यार्थीनी इयत्ता सातवीत शिकत असून ती आजारी असल्याने डॉक्टरांनी तिला रजा घ्यायला लावली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ती स्कूलमध्ये गेली असता त्या मुख्याध्यापिका, चेअरमनने तिला अपशब्द वापरून मानसिक छळ सुरू करण्यास सुरुवात केली. त्या मुलीला बाहेर जाण्यास न देणे, लघुशंका करण्यास बंदी, या छळामुळे त्या मुलीने आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिली.
दरम्यान बुधवारी ती मुलगी या व्यवस्थापन मंडळाच्या छळामुळे बेशुद्ध होऊन कोसळली. तिला म्हापसा आझिलो इस्पितळात दाखल करून सलायन लावण्यात आले व उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. पालक वर्गांनी त्या चेअरमन व मुख्याध्यापिकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी
घटनेची माहिती मिळाल्यावर बार्देश तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार टोपले व इन गोवाचे संपादक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई निरीक्षक तुषार लोटलीकर यांची भेट घेऊन पत्रकाराला जीपमध्ये जबरदस्तीने बसवून पत्रकाराचा पॅमेरा, ओळखपत्र आदी दस्ताऐवज हिसकावून घेणाऱया त्या स्कूलच्या व्यवस्थापन मंडळ तसेच त्या साध्या वेषातील पोलीस हवालदाराने गैरवर्तणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लेखी केली आहे.हा स्कूलचा विषय मुख्यमंत्र्यापर्यंत नेण्याचे आश्वासनही श्री. टोपले यांनी यावेळी दिले. तसेच पोलिसांच्या वृत्तीचा निषेध करण्यात आला. व या हायस्कूलची परवानगी मागे घेऊन हे स्कूल रद्द करावे असे ते म्हणाले. मुलीची लघुशंका, पाणी पिण्यास बंदी, वर्गातून बाहेर जाण्यास बंदी हे कायद्याने गैर असून याबाबतचा अहवाल शिक्षण सचिवाना पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.









