वार्ताहर / किणये
निलजी गावचे सुपुत्र विठ्ठल पाटील यांना बेडकिहाळ येथील शिंगाडे सामाजिक संस्थेच्यावतीने आदर्श कोविड योद्धा समाजसेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. निपाणी येथील शासकीय विश्रामगृह कार्यालयात रविवारी शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल पाटील यांना आदर्श कोविड योद्धा समाजसेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
विठ्ठल पाटील हे बेळगाव येथील ‘वन टच फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. या फाउंडेशनच्यावतीने बेळगाव परिसर व ग्रामीण भागातील काही गरजू व होतकरू लोकांना नि:स्वार्थीपणे मदत कार्य केलेले आहे. कोरोना महामारीच्या काळात फाउंडेशनच्यावतीने अनेक गरजू लोकांना विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे. तसेच या फाउंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आलेले आहेत. या सर्वांची दखल घेऊन विठ्ठल पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
निपाणीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे व शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते विठ्ठल पाटील यांना हा पुरस्कार प्रदान आला.
हा पुरस्कार माझा एकटय़ाचा नसून ‘वन टच फाउंडेशन’च्या सर्व कार्यकर्त्यांचा व माझ्यासोबत सामाजिक कार्यात मदत करणाऱया माझ्या सहकाऱयांचा यामध्ये समावेश असल्याचे सत्काराला उत्तर देताना विठ्ठल पाटील यांनी सांगितले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल बेळगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.









