जिल्हा पोलीसप्रमुख अनुपम अगरवाल यांची माहिती
वार्ताहर/ विजापूर
2 नोव्हेंबर रोजी कन्नाळ क्रॉसजवळ महादेव सावकारांवर 15 ते 20 जणांकडून गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी काहीजणांना अटक करण्यात आली होती. तसेच इतरांची ओळख पटल्याने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दोन पथकांची नेमणूक केली होती. त्यानुसार या पथकातील अधिकाऱयांनी शुक्रवारी दोघांना अटक केली होती. आता शनिवारी पुन्हा या घटनेतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चार मोबाईल, एक कोयता, एक ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे.
यासीन रमजनसाब धंदरगी (वय 25), करेप्पा महादेव सोन्नद (वय 25), सिद्धू बसाप्पा बोमनजोगी (वय 34, तिघे रा. अटालट्ट), सचिन तुकाराम मानवर (वय 28, रा. अलियाबाद), रवी धरेप्पा बंडी (वय 20, रा. चडचण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याचबरोबर यानंतर विजापूर येथे मडिवाळ हिरेमठ यांच्या स्वामी फायनान्स कार्यालयात महादेव सावकार यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक आरोपीला एक लक्ष्य देण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख अनुपम अगरवाल यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पोलीसप्रमुख अगरवाल पुढे म्हणाले, या प्रकरणात अनेकजण सहभागी असून महादेव सावकार यांच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन विजापुरात रचल्याचा संशय आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मडिवाळ हिरेमठ स्वामीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. याआधी महादेव सावकर यांना अनेकवेळा मारण्याचा कट रचला होता. माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रविगौडा पाटील यांच्या अंत्यविधीवेळी महादेव सावकार उपस्थित होते. तेंव्हाही त्यांना मारण्याचा कट रचला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला मार्ग बदल्याने ते वाचले होते. तसेच धर्मराज चडचणच्या पुण्यतिथीवेळीही अटक केलेले आरोपी जमले होते. त्यावेळी चडचण कुटुंबीयांसोबत चर्चा केल्याची माहिती उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर विजापूर येथे मडिवाळ हिरेमठ यांच्या स्वामी फायनान्स कार्यालयात महादेव सावकार यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक आरोपीला एक लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार सिद्धू बोमनजोगीला महादेव सावकार यांच्या गाडीला धडक देणे, खाली उतरुन कोयत्याने मारणे, संजू मानवरला गावठी बॉम्ब टाकणे अशी प्रत्येकाला एक लक्ष्य देण्यात आले होते. आरोपींपैकी रवि बंडी हा धर्मराज चडचण यांचा कट्टर समर्थक आहे, असेही पोलीसप्रमुख अगरवाल यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीसप्रमुख डॉ. श्रीराम अरसिद्धी, डीवायएसपी लक्ष्मीनारायण, सीपीआय रविंद्र नायकोडी, महांतेश द्यामण्णावर, बसवराज मुकर्तीहाळ, सी. बी. बागेवाडी, पीएसआय महेश लमाणी, सोमशेख गेज्जे आदी उपस्थित होते.









