रोगराई पसरण्याचा धोका : परिसरातील नागरिकांत तीव्र संताप
वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱया विजयनगर परिसरातील कचऱयाची उचल करण्याकडे पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिसरातील गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना तीव्र संताप व्यक्त होत असून, त्वरित कचऱयाची उचल न केलेल्या पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विजयनगर चौथा क्रॉस परिसरातील नागरिकांनी बुधवारी(दि. 10) स्वच्छता अभियान राबविण्याच्या मागणीसाठी ग्राम पंचायत विकास अधिकाऱयांना निवेदनही दिले आहे. तरीदेखील अद्यापही पंचायतीकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. कर्मचाऱयांनी गटारीतील कचरा बाहेर काढुन रस्त्यावर ठिकठिकाणी तसाच ठेवला आहे. सदर रस्त्यावरून नागरिकांची दैनंदिन वर्दळ सुरू असते. तर लहान मुले या ठिकाणीच खेळत असतात. याबाबत वारंवार पंचायतीला कळवूनही पीडीओ आणि सदस्यांनी स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी संतप्त नागरिकांनी बुधवारी थेट पंचायतीला निवेदन देऊन स्वछतेची मागणी केली आहे.
निवेदनावर विशाल चव्हाण, सुरेंद्र चव्हाण, मिलींद चव्हाण, विश्वास मानकर, सुलभा चव्हाण, एम. एस. वरुटे, पूजा चव्हाण, प्रवीण वरुटे, मनोहर पाटील, स्वाती सावंत, साईनाथ माने, पी. एस. कुसर्ले, स्वप्निल राजाईकर, पी. एम. लोहार, रुपा केसरकर यांच्यासह परिसरातील रहिवाशांच्या स्वाक्षऱया आहेत..









