राणेंचे खंदे समर्थक : कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लवकरच शिवबंधनात अडकणार
प्रतिनिधी / कुडाळ:
भाजप नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक तथा जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी रात्री कुडाळकर यांच्या पिंगुळी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेत चर्चा केली. कुडाळकर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे राणे यांना हा धक्का मानला जात आहे.
शनिवारी रात्री पालकमंत्र्यांसमवेत कुडाळकर यांची चर्चा झाली. यावेळी विकासकामे, संघटना बांधणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आपला शिवसेना पक्षप्रवेश निश्चित झाल्याचा शब्द कुडाळकर यांनी सामंत यांना दिला. मात्र, आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करेन व सर्वांच्या सहमतीने नंतर प्रवेश करू, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही आपल्या पक्षप्रवेशाची कल्पना द्या, असे कुडाळकर यांनी आमदार नाईक व अन्य पदाधिकाऱयांना सांगितले.
कुडाळकर हे राणे यांचे उजवे हात मानले जाणारे मालवणचे नेते दत्ता सामंत यांच्या मर्जीतील व विश्वासू नेते आहेत. मध्यंतरी सामंत यांचाही सेनेत प्रवेश होणार, अशी चर्चा होती. मात्र, सध्यातरी त्या चर्चेला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे, असे बोलले जात आहे. मात्र, कुडाळकर यांचा सेना प्रवेश निश्चित झाला आहे.
राणे समर्थंकांकडून समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न
राणे समर्थक नेत्यांकडून कुडाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. कुडाळकर लवकरच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवबंधनात अडकणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संतोष शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, वेंगुर्ले नगरसेवक संदेश निकम, पं. स. माजी सदस्य गंगाराम सडवेलकर व अन्य यावेळी उपस्थित होते.
राणेंचे सहकारी एकापाठोपाठ चालले सोडून
नारायण राणे सिंधुदुर्गचेच नव्हे, तर राज्याचे नेते मानले जातात. ज्यांच्या साथीने राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्व सत्तास्थाने काबीज केली, ते सहकारी एकापाठोपाठ एक राणे यांना सोडून चालले आहेत. जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, सतीश सावंत, विकास कुडाळकर हे सर्व डावे-उजवे सोडून चालले आहेत. त्यामुळे राणे यांचे जिल्हय़ावरील वर्चस्व कमी होत असल्याची चर्चा आहे.









