गल्लीबोळात विकास कामांचा धमाका
सुधाकर काशीद / कोल्हापूर
शहरातील प्रमुख मार्गाचे डांबरीकरण राहू दे, पण गल्लीबोळातही गेली तीन-चार वर्षे रखडलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. गल्लीतल्या एका दोघांच्या नव्हे तर दहा दहा ज्येष्ठ मतदारांच्या हस्ते फटाफटा नारळ फोडून डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. गेली तीन-चार वर्षे निधी नाही म्हणून रखडलेल्या कामांना निवडणुकीच्या तोंडावरच कुठून विकास निधी मिळाला हा सर्वसामान्यांच्या मनातला उपहासात्मक प्रश्न आहे. पण ही सर्व विकासकामे केवळ निवडणूक डोळ्यासमोर आहे म्हणूनच होत आहेत हे या कामांचा एकूण गाजावाजा पाहता स्पष्ट झाले आहे.
विकास कामे ही निरंतर प्रक्रिया असते. ज्या प्रभागात ज्या कामाची गरज त्यानुसार कामाचे नियोजन असेच या विकास कामाचे स्वरूप असते. पण कोल्हापुरातले अनेक रस्ते गल्ली बोळ गेली तीन-चार वर्षे उखडलेल्या अवस्थेत होते. रस्त्याचे डांबरीकरण करा अशी मागणी करून शहरवासीय थकले होते. फारच असंतोष नको म्हणून काही प्रमुख मार्गाचे डांबरीकरण झाले होते. पण गल्ली बोळ तसेच होते. गेल्या दहा पंधरा दिवसात मात्र आणि तेही प्रभाग आरक्षणानंतर गल्लीबोळात रात्री खडीचे डंपर येण्यास सुरुवात झाली. खडीचे ढिग टाकून कामांना सुरुवात होणार याची जणु सुचना देण्यात आली. हे ढिगही आठ-दहा दिवस तसेच पडुन राहीले. आणि आता नेत्यांच्या हस्ते, गल्लीतल्या ज्येष्ठ मतदारांच्या हस्ते या कामांना प्रारंभ झाला आहे. पाच वर्षे दुर्लक्षित केलेल्या मतदारांना मुद्दाम नारळ फोडण्याचा मान दिला जात आहे .उदघाटनासाठी किमान 10 जणांकडून नारळ फोडण्याचा कार्यक्रम होत आहे. त्याचे फोटो क्षणात प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हाट्सअप, फेसबुकचा प्रभावी वापरही आहे. काही भागात तर व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत .
या विकास कामांचे गाजावाजा करून उदघाटन यामागे निवडणूक हे कारण अगदी स्पष्ट आहे .पण या गाजावाजाचा उलटा परिणाम ही होण्याची शक्यता आहे. कारण चार वर्षे खड्डÎातून ये-जा कराव्या लागलेल्या रस्त्यावर आता निवडणुकीच्या आधी खडी, डांबर कशी पडते त्याची खास कोल्हापुरी शैलीत प्रभागा प्रभागात चर्चा आहे .काही रस्त्यांची कामे इतक्या घाईघाईने केली जाऊ लागली आहेत की ,या कामा पूर्वी आवश्यक खबरदारी घेणे (पाण्याचे नळ, केबल, ड्रेनेज) आवश्यक होते. ती ही घेतली गेलेली नाही. त्यामुळे नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर काही ठिकाणी पुन्हा खुदाई चालू झाली आहे.
कामाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईपर्यंत या विकासकामांचा धडाका चालू राहणार आहे काही प्रभागात तर विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा चालू आहे.