वृत्तसंस्था/ बॅसेटेरी
रविवारी येथे झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या टी-20 सामन्यात विंडीजने आयर्लंडचा 9 गडय़ांनी पराभव करून तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. या शेवटच्या सामन्यात विंडीजचा सलामीचा फलंदाज लेंडल सिमन्सने 10 उत्तुंग षटकारांसह नाबाद 91 धावांची वादळी खेळी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा डाव 138 धावांत आटोपला. त्यानंतर विंडीजने 1 बाद 139 धावा जमवित हा सामना जिंकत तीन सामन्यांची ही मालिका बरोबरीत सोडविली.
आयर्लंडच्या डावात सलामीचा केव्हिन ओब्रायनने 18 चेंडूत 36 धावा तर स्टर्लींगने 11 धावा जमविल्या. पहिल्या 3.3 षटकांत आयर्लंडने अर्धशतक पूर्ण केले होते. आयर्लंडची एकवेळ स्थिती 2 बाद 74 अशी समाधानकारक होती पण त्यानंतर त्यांचे शेवटचे आठ गडी 64 धावांची भर घालत तंबूत परतले. आयर्लंडच्या बेलबिरेनीने 23 चेंडूत 28 धावा जमविल्या. विंडीजतर्फे पोलार्ड आणि ड्वेन ब्रॅव्हो यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्त्युतरादाखल खेळताना विंडीजने 1 बाद 139 धावा पटकाविल्या. सलामीच्या सिमन्सने 10 षटकार आणि 5 चौकारांसह 40 चेंडूत नाबाद 91 जमविल्या. सिमन्सने आपल्या संघाला विजय मिळवून देत आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. सिमन्सने विजयी षटकार ठोकून विंडीजला ही मालिका बरोबरीत सोडवून दिली. लेविसने 3 षटकार आणि 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. विंडीजने हा सामना 54 चेंडू बाकी ठेवून जिंकला.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड- 20 षटकांत सर्वबाद 138 (के. ओब्रायन 36, स्टर्लींग 11, बेलबेरेनी 28, पोलार्ड आणि ड्वेन ब्रॅव्हो प्रत्येकी 3 बळी),
विंडीज- 11 षटकांत 1 बाद 139 (सिमन्स नाबाद 91, लेविस 46).









