प्रतिनिधी/ वास्को
कोरोनाचा प्रादर्भावा रोखण्यासाठी वास्को शहरात काल शुक्रवारी निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्या आली. अग्नीशामक दल व मुरगाव पालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक व कदंब महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर व इतर नगरसेवक उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी मुरगाव पालिका इमारतीकडून या निर्जंतुकीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली. पालिका इमारत परीसर, रेल्वे स्थानक, शहरातील फुटपाथ व इतर ठिकाणी तसेच बायणा येथेही औषध फवारणी करण्यात आली. अग्नीशामक बंबाची या कामासाठी मदत घेण्यात आली. पहिल्याच टप्प्यात चाळीस लिटर रसायनाची फवारणी करण्यात आली. शहर व आवश्यक ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी मुरगाव पालिकेला सध्या 150 लिटर औषध उपलब्ध झालेले असून हे काम चालूच राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली. वास्कोतील पोलीस, अग्नीशामक दल, पालिका कर्मचारी व इतरांना मिळून जवळपास हजार मास्क पालिकेने पुरवले असल्याचेही त्यांनी सांगितले.









