तीन वर्षे एकाच ठिकाणी असलेली वाहने अथवा दुरुस्ती आणि इतर वाहनांनी भरावा कर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्राच्या विभागात तसेच जिह्यातील विविध उपआरटीओ विभागांत येणाऱया वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी अनेक वाहने रस्त्यांवर अथवा घरातच पडून आहेत. अशा वाहनांच्या मालकांनी कर भरावा व वाहने रस्त्यांवर चालवावीत, अन्यथा त्यांच्या वाहनांचे परवाने (आरसी) रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिली.
बेळगाव शहर व परिसरात अनेक ठिकाणी चार चाकी, सहा चाकी व इतर वाहने थांबलेली दिसतात. अशा वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून तीन महिन्यांतून एकदा कर भरण्याच्या नोटिसा पाठविण्यात येतात. मात्र, अनेकांनी संबंधित नोटिशीला उत्तरही दिले नाही अथवा करही भरला नाही. तब्बल तीन वर्षांपर्यंत त्यांना नोटिसा बजावण्यात येतात. मात्र कोणतीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे अशा वाहनांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. तीन वर्षांनंतर जी वाहने पडून आहेत व ज्या वाहनांचा कर भरला गेला नाही अशा वाहनांचे परवाने रद्द करून ती वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कमल टीआरडी-45 एसएपीनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. तशा प्रकारच्या सूचना पोलीस अधिकाऱयांना करण्यात आल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडली असेल किंवा वाहन वापराविना पडून असेल, दुरुस्तीसाठी दिलेली वाहने पडून असतील तर त्यांनी कर भरणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार नोटिसा बजावूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता वाहन परवाने रद्द करण्यात येणार असून ज्यांना कर भरायचा आहे अथवा वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे आहे त्यांनी तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









