प्रतिनिधी/ रत्नागिरी
एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱया गमावल्या. एका बाजूला आजाराची भीती व दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाडय़ांवर नागरिक लढा देत असताना प्रचंड वीजबिल पाठवून दिले. एका वर्षाला येणारी रक्कम तीन महिन्यात आल्याने नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून वीज देयकांत सामंजस्याची भूमिका घेत बिलात सवलत द्यावी, अशी मागणी गुरुवारी मनसेकडून मोर्चाद्वारे केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱयांकडे सादर करण्यात आले आहे.
गेल्या 4-5 महिन्यापासून वाढीव वीजबिलाबाबत रत्नागिरी जिल्हा नवनिर्माण सेनेकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. 1500 ग्राहकांच्या वीजबिलांचे निवेदनही नुकतेच सादर करण्यात आले होते. पहिल्या तीन महिन्यांची बिले माफ करण्यात यावी किंवा सवलत देण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. 100 युनिटपर्यंत सवलत देवू, असे म्हणणाऱया उर्जामंत्र्यांनी आता घुमजाव केल्याने याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे मोर्चादरम्यान जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.
काही झाले तरी ही वाढीव वीज देयक भरू नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जावणणार नाही, सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत आदींनी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. मोर्चाचा प्रारंभ मारूती मंदिर येथून झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला. या मोर्चात जिल्हय़ातून मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह नागरिकही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.









