प्रति किलो 95 रुपये दर, दोन दिवसांत 30 टन काजूची खरेदी, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या बागायतदारांना दिलासा
प्रतिनिधी / सांगे
अद्याप गोवा बागायतदार आणि आदर्श कृषी संस्थेने काजू खरेदी करण्यास प्रारंभ केला नसला, तरी सांगेतील वाडे-कुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेने मंगळवारपासून 95 रुपये प्रति किलो या दराने काजुबियांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात काजुबिया विक्रीसाठी घेऊन येत आहेत. दोन दिवसांत तब्बल 30 टन काजू संस्थेने खरेदी केला असल्याची माहिती अध्यक्ष फ्रान्सिस मास्कारेन्हस यांनी दिली.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सोसायटीने शेतकऱयांकडून काजुबियांची खरेदी केली आहे. यापूर्वी संस्थेने 132 रुपये प्रति किलो याप्रमाणे काजुबिया खरेदी केल्या होत्या. त्यानंतर 22 मार्च रोजी प्रथम जनता कर्फ्यू व त्यानंतर लॉकडाऊन जाहीर केल्याने काजू खरेदी व्यवहार पूर्णपणे बंद झाला होता. या भागातील काजू खरेदी करणारी वाडे-कुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्था हीच प्रमुख आहे. शेतकऱयांकडून वारंवार काजू खरेदी करण्याची मागणी जोर धरू लागल्याने संस्थेच्या व्यवस्थापनाने यावर विचारविनिमय करून व मेसर्स झांटय़े यांच्याशी बोलणी करून 95 रुपये प्रति किलो या दराने काजुबिया खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे.
शेतकरी सापडले होते अडचणीत
अजूनपर्यंत काजूचा दर कृषी पणन मंडळ व अन्य संस्थांच्या माध्यमातून निश्चित झालेला नाही. तसेच काजू खरेदी करण्यास अन्यत्र प्रारंभही झालेला नाही. त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत सापडले आहेत. अशा शेतकऱयांनी वाडे-कुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेला भेटून काजू खरेदी करण्याचे साकडे घातले होते. उत्पादित काजुबियांची विक्री करता येत नसल्याने शेतकऱयांच्या हातात पैसे येणे मुश्किल होऊन बसले होते. त्यातच काजुबियांची खरेदी करणारे काही व्यापारी 70 ते 80 रुपये प्रति किलो याप्रमाणे खरेदी करत होते.
दरात वाढ करण्याची मागणी
सांगे तालुक्यात काजूचे पीक उत्तम प्रकारे येत असून उत्पन्नाचा आकडाही मोठा आहे. मात्र सध्याचा दरात वाढ करण्याची मागणी येथील शेतकरी करत आहे. एरव्ही प्रक्रिया केलेल्या काजुबियांचा प्रति किलो दर 900 ते 1000 रुपयांच्या घरात आहे. मात्र शेतकऱयांना का म्हणून कमी दर दिला जातो, असे काजू उत्पादकांचे म्हणणे आहे. याकडे काजूचा दर निश्चित करणाऱया यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून सरकारने काजुसाठी 100 रुपये हा हमी भाव निश्चित केलेला आहे. त्यात हल्लीच्या वर्षांत वाढ देखील केलेली नाही. त्यामुळे सरकारने हमी भावात वाढ करण्याची मागणी होत आहे.
धास्तावलेल्या बागायतदारांना दिलासा
यंदा कोरोनाचे संकट असल्याने काजू बागायतदारांना आपले काय होईल अशी भीती सतावते आहे. उत्पादित काजुबियांची विक्री करणे मुश्किल बनले आहे. तसेच काजूपासून तयार केलेला हुर्राक व फेणी यांची विक्री करणेही कठीण होऊन बसले आहे. त्यातच मिळेल त्या दरात काजूची विक्री करावी लागत आहे. काजू हे नगदी पीक असून या पिकातून मिळणाऱया उत्पन्नावर अनेक कुटुंबे आपला चरितार्थ चालवत असतात. अशा परिस्थितीत अखेरीस वाडे-कुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेने काजुबियांची खरेदी करण्यास प्रारंभ करून शेतकऱयांना दिलासा दिला आहे.
शेतकऱयांच्या वाढत्या मागणीमुळे खरेदीस प्रारंभ
वाडे-कुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेने काजुबिया खरेदी करण्यास प्रारंभ केल्यानंतर कृषी पणन मंडळ तसेच आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप व गोवा बागायतदारचे पाटील यांनी आपल्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण त्यांना शेतकऱयांची वाढती मागणी असल्याने काजुबियांच्या व्यवसायातील मे. झांटय़े यांच्याकडून दर घेऊन खरेदीस प्रारंभ केल्याचे स्पष्ट केले, असे मास्कारेन्हस यांनी सांगितले. शेतकऱयांची अडचण लक्षात घेऊन संस्थेने हे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. दरवर्षी या संस्थेकडून काजुबियांची खरेदी केली जाते.