तारुण्याचा काळ हा माणसाच्या आयुष्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा काळ असेल. या काळात माणूस धड मोठाही नसतो किंवा छोटाही नसतो. एका दिशाहीन प्रवाशासारखा स्वतःचे अस्तित्व शोधत तो फिरत असतो. जबाबदाऱयांचे ओझे हळूहळू खांद्यावर पडायला लागल्यामुळे त्याच्या जुन्या तणावमुक्त आयुष्याचे निरोप घेणे कठीण होत असते. त्याचवेळेला स्वप्नांचा पेटारा उघडत असतो आणि त्या स्वप्नांपर्यंत पोचायला मदत करणारे पंखदेखील फुटत असतात. क्रांती घडवायची क्षमता जितकी या काळात आहे तितक्मयाच मर्यादादेखील आहेत.
कोणत्याही क्षेत्रात अनुभव फार महत्त्वाचा असतो. या अल्लड वयातील तरुणांनी जग बघितले नसल्यामुळे तो अनुभव त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे बऱयाचदा जगात आपले अस्तित्व स्थापन करायला तरुणांना खूप काळ लागतो. क्षमता, बुद्धिमत्ता, आणि प्रतिभा असूनसुद्धा केवळ कागदोपत्री न दिसणाऱया अनुभवांमुळे हा तरुण गर्दीत हरवून जातो. मग जीवनाच्या या शर्यतीत त्याच्याकडे इतके दुर्लक्ष केले जाते की त्याचे मानसिक खच्चीकरण होते आणि त्याचबरोबर त्याच्या स्वप्नांचा चुरा होतो. एकेकाळी ऊर्जेने आणि कल्पनांनी भरलेले हे तरुण, जीवनातील शर्यतीत विरघळून जातात.
खूप कमी तरुण असे असतात जे या शर्यतीचा भागच नसतात. त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे एक शर्यत नसून एक असे नाटक असते ज्याचा सूत्रधार ते स्वतः असतात. भारतातील उद्योजकांच्या वारसांमध्ये अनेक दिग्गजांचे नाव घेतले जाते. रतन टाटा, अंबानी, पूनावाला, गौतम अदानी इत्यादी. ही सर्व वरि÷ माणसे आज जगात चांगलीच स्थापित आहेत. पण काही तरुण असे आहेत ज्यांनी तारुण्यातील या शर्यतीतून बाहेर पडून स्वतःच्या नाटकाचे सूत्रधार बनून जगासमोर एक नवीन आदर्श मांडला आहे. या तरुणांकडे ना अनुभव होता, ना भरमसाठ पैसा आणि ना ओळखी. होती ती फक्त एक जग बदलण्याची इच्छा आणि ती पूर्ण करायला लागणारे धैर्य. भारताचे हे तरुण उद्योजक आणि उद्योजकांनी हे सिद्ध केले आहे की जिकडे इच्छा असेल तिकडे मार्ग नक्कीच निघतो.
1. रितेश अगरवाल (वय वर्ष 28)-
ओयो नावाच्या मोठय़ा हॉटेलच्या साखळीबद्दल कोणाला माहिती नाही? ओयोसारख्या व्यवसायामुळे अनेक हॉटेल्सच्या धंद्यामध्ये वृद्धी झाली आहे. त्या व्यतिरिक्त उद्योजक, तरुण, पर्यटक या सर्वांना परवडेल असे हॉटेल एका बटनावर आपल्याला उपलब्ध आहे. या सर्वांचा सूत्रधार रितेश अग्रवाल नावाचा एक 28 वषीय तरुण आहे. केवळ 20 वर्षांचा असताना, ओडिशामधील मध्यमवर्गीय घरातून आलेल्या या तरुणाने ओयो हॉटेल्सची कल्पना स्थापित केली. त्यावेळेला त्याला भरपूर टीका आणि विरोध सहन करावा लागला, पण 2020 मध्ये ‘30 अंडर 30’ या फोर्ब्स मासिकातील प्रति÷ित श्रेणीत त्याचे नाव आले होते आणि आज तो भारतातील सगळय़ात तरुण अब्जाधीश आहे.
2. तिलक मेहता (वय वर्ष 15)-
जगातील सर्वात तरुण उद्योजक हा आपल्या भारताचा तिलक मेहता आहे. वयाच्या 15 व्या वषी त्याने ‘पेपर आणि पार्सल’ ही कंपनी स्थापन केली. मुंबईमध्ये घरोघरी एका दिवसात पार्सल पोचवण्याचे काम ही संस्था पार पाडते. ही व्यावसायिक संस्था मुंबईतील डबेवाल्यांबरोबरदेखील काम करते. ही संस्था एका दिवसात मुंबईमध्येच साधारण 1200 वस्तूंचे वितरण करते. या तरुणाच्या धडाडी आणि सर्जनशीलतेसाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
3. श्रीलक्ष्मी सुरेश (वय वर्ष 23)-
ज्या वयात माणूस अजून पूर्णपणे विकसित झालेला नसतो, त्या वयात श्रीलक्ष्मीनी स्वतःची वेबसाईट बनवली. तेव्हा ती फक्त 6 वर्षांची होती! आज 23 वर्षाच्या या तरुणीने 2 व्यावसायिक संस्था स्थापित केल्या आहेत. भारतातील सर्वात तरुण सीईओ मानल्या जाणाऱया या मुलीने ई-डिझाईन नावाची संस्था 11 व्या वषी सुरू केली. आज ही संस्था गगनभरारी घेत आहे. श्रीलक्ष्मीने तिच्या या पुढाकारातून अनेक तरुण मुला-मुलींना स्वप्नांना पूर्ण करायचे प्रोत्साहन दिले आहे.
4. त्रिशनित अरोरा (वय वर्ष 27)-
एखाद्या मुलाने जर शाळा सोडली असेल तर त्याच्या आयुष्याचे नुकसानच होणार असे सगळय़ांना वाटते. पण काही लोक शाळेच्या चार भिंतींमध्ये बांधून राहणारी नसतात तर आकाशाकडे झेप घेणारी असतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे त्रिशनित अरोरा. शालेय शिक्षण सोडल्यावर त्याला भरपूर टीका सहन करावी लागली. पण त्याने सगळय़ांना त्याच्या कर्तृत्वाने हे दाखवून दिले की पदवी असली तरच माणूस हुशार असतो असे नाही. माणूस स्वतःचे अस्तित्व स्वकर्माने घडवत असतो. त्याची ‘टाक सिक्मयुरिटी’ नावाची संस्था महाजालावरील (इंटरनेट) सुरक्षा, त्यावरील होणारे गुन्हे यावर काम करते. ही चार नावे पुढच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत. जग झपाटय़ाने बदलत आहे आणि त्याचबरोबर जुन्या पद्धतीही बदलत चालल्या आहेत. आजची तरुण पिढी ही पुस्तकी माहितीच्या पलीकडे जाऊन स्वतः उत्तरे शोधण्याची क्षमता ठेवते. स्वकर्मावर जग बदलायचे धाडस या पिढीमध्ये आहे.
अशावेळेला, या पिढीला भरारी घ्यायला मदत केली पाहिजे. माणसाचे वय किती आहे यापेक्षा त्याचे कर्तृत्व आणि जग बदलायची इच्छा किती प्रबळ आहे यावरून त्याला ओळखले गेले पाहिजे. वय आणि त्याबरोबर जोडल्या जाणाऱया अपेक्षा या मानवी निर्मिती आहेत आणि त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही हे लक्षात आले पाहिजे. जिकडे जगात क्रांती होण्याची क्षमता आहे तिथे वयाच्या आणि अनुभवाच्या मर्यादा लावल्या जाऊ नयेत..
नवीन पिढीला स्वतंत्र होऊन जगात स्वतःसाठी कसे जगायचे हे शिकवले पाहिजे. मनमोकळेपणाने चुका करून, त्यामधून शिकून, त्याचे सार्थक कसे करायचे हे शिकवले पाहिजे. प्रत्येक पिढी ही काही ना काहीतरी क्रांती घडवत असते त्यामुळे या क्रांतीला प्रोत्साहन देऊन त्याला तुमच्या अनुभवाचे सल्ले जोडले, तर जगाचा उद्धार होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही!
-श्राव्या माधव कुलकर्णी








