25 वेळा झाला आहे अनुत्तीर्ण
माणसाला त्याची स्वप्ने स्वस्थ बसू देत नाहीत. चीनमधील एका 55 वर्षीय व्यक्तीने बालपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजही धडपड सुरूच ठेवली आहे. लियांग शी नावाच्या व्यक्तीचे एक दिवस सिचुआन विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे. परंतु अद्याप त्यांचे हे स्वप्न पूर्ण झालेले नाही.
या प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी लियांग यांनी तब्बल 25 वेळा प्रयत्न केला, परंतु त्यांना यात यश मिळालेले नाही. 8-10 वेळा अपयश आल्यावर लोक हार मानतात, परंतु लियांग यांना या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत एकदा उत्तीर्ण होणार असा विश्वास आहे. लवकरच ते 26 व्यांदा प्रवेशपरीक्षेला बसणार आहेत.

चीनमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी एक सामायिक परीक्षा असते, ज्याला गोआको एक्झाम म्हटले जाते. याच्या माध्यमातूनच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. लियांग ही परीक्षा 1983 पासून देत राहिले आहेत. या परीक्षेत ते उत्तीर्ण देखील झाले आहेत, परंतु त्यांचे गुण दुसऱया स्तरावरील विद्यापीठात प्रवेश मिळविण्याइतके होते. लियांग सलग 25 वर्षांपासून सिचुआन विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षेस बसत आहेत. स्वतःच्या पसंतीच्या विद्यापीठात प्रवेश मिळविल्यावरच हा लाँग मार्च संपवू असे त्यांचे म्हणणे आहे.
विज्ञानात अडचण
लियांग यांना परीक्षेत सर्वाधिक अडचण विज्ञानाच्या प्रश्नांमुळे होते. याचमुळे ते आता कला विभागासाठीच्या परीक्षेला बसणार आहेत. गोष्टी लक्षात ठेवण्याचे वय निघून गेल्याचे लोक त्यांना सांगत असतात. परंतु लियांग त्यांचा हा दावा चुकीचा ठरवू इच्छित आहेत. गोआको एंट्रेन्स एक्झामला जगातील सर्वात अवघड विद्यापीठ प्रवेशपरीक्षांपैकी एक मानले जाते. यात लाखो विद्यार्थी सामील होतात, परंतु चीनच्या आघाडीच्या विद्यापीठांमध्ये जागा कमी संख्येत असल्याने याकरता मोठी स्पर्धा दिसून येते.









