किरपे येथील घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप, जखमी मुलाची प्रकृती चांगली
वार्ताहर / कोयना वसाहत :
कराड तालुक्यातील बिबटय़ाच्या हल्ल्यात येणके येथील मुलगा दोन महिन्यांपूर्वी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच काल अचानक किरपे येथे पाच वर्षीय राज देवकर या मुलावर बिबटय़ाने त्याचाच शेतात येऊन हल्ला केला. पोतले, घारेवाडी, येणके, किरपे, तांबवे, चचेगाव याठिकाणी बिबटय़ाचे दर्शन नित्याचाच झाले असून असे हल्ले झाल्यावरच वनविभागाला जाग येत आहे, असा आरोप करत ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. बिबटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या राज धनंजय देवकर याच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली आहे. मात्र त्याच्या वडिलांसह नातेवाईकांनी बिबटय़ाच्या हल्ल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. वनविभागाने वेळीच उपाय योजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. कराड तालुक्यात बिबटय़ाचे हल्ले नित्याचे होत आहेत. हल्ला झाला की तेवढय़ा वेळापूरताच वनविभाग जागा होतो असेच झाले आहे. इतर वेळी वनविभाग बिबटय़ा पकडण्यासाठी त्याच्या बंदोबस्त करण्यासाठी नक्की करतो काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
येणके येथे हल्ला झाला त्यात सात वर्षीय मुलाने आपला जीव गमावला त्यावेळी वनविभाग चोवीस तास तळ ठोकून बसले होते.पिंजरे लावून किंवा वेब कॅमेरे लावून आठ दिवस अथक काम करून एक बिबटय़ा जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.पण त्यांनंतरही नागरिकांना अनेक ठिकाणी अनेक वेळा बिबटय़ाचे दर्शन होत आहे. संरक्षित क्षेत्र सोडून आता बिबटय़ा घरात आणि अंगणात येऊ लागला आहे. सर्वत्रच ग्रामपंचायत असो किंवा नागरिक यांनी वेळोवेळी वनविभागाला निवेदने देऊनही वनविभाग हात वरच करत आहे असे दिसत आहे.
हल्ला पुरते जागे इतर वेळी वनविभाग सुस्त आहे. गुरुवारी सायंकाळी किरपे येथील राज देवकर या पाच वर्षाच्या बालकावर बिबटय़ाने हल्ला करून त्याला मानेला पकडून बिबटय़ा घेऊन जाऊ लागला. सोबतीला त्याचे वडील धनंजय देवकर होते बिबटय़ाच्या हल्ल्यानंतर काही वेळ घाबरलेले धनंजय देवकर हे क्षणार्धात सावध झाले आणि त्यांनी बिबटय़ाचा पाठलाग करायला सुरुवात केली शेतातील तारेचे कंपाउंड जवळ बिबटय़ा थबकल्यानंतर देवकर यांनी तात्काळ राजचा पाय पकडून त्याला ओढायला सुरुवात केली बिबटय़ा कंपाउंड ला धडकल्यामुळे बिबटय़ाची पकड ढिली झाली आणि राज धनंजय देवकर यांच्या हातात आला यावेळी आरडाओरडा करून धनंजय देवकर यांनी बिबटय़ा ला पळवून लावलेआणि एक बाप बिबटय़ावर भारी ठरला.
धनंजय देवकर यांनी धाडसाने राजचा पाय पकडून त्याला ओढल्याने बिबटय़ाच्या कराल दाढेतून राज सुटू शकला या हल्ल्यात राज्याच्या माने ला काना शेजारी हातावर पायावर पाठीवर मोठय़ा जखमा झाल्या आहेत.वनविभागाचे कर्मचारी पोलीस पाटील ग्रामस्थ यांच्या सहाय्याने राजला उपचारार्थ कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.बिबटय़ाच्या या हल्ल्यामुळे या परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे या बिबटय़ांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.