‘लॉकअप डेथ’ प्रकरणी मुलीचा पोलिसांवर खळबळजनक आरोप
प्रतिनिधी/बेळगाव
माझ्या वडिलांना बीपी, शुगर नव्हते. हृदयरोगाचीही लक्षणे नव्हती. असे असताना ‘हृदयाघाताने वडिलांचे निधन झाले आहे’, या पोलिसांच्या सांगण्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोलीस कोठडीत असताना मृत्युमुखी पडलेल्या बसनगौडा पाटील (वय 45) यांच्या मुलीने उपस्थित केला आहे. पोलिसांच्या छळामुळे आपल्या वडिलांचा ‘लॉकअप डेथ’ झाला आहे. वडिलांच्या मृत्यूला न्याय द्या, अशी मागणीही रोहिणी पाटील यांनी केली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील अधिकारी व पोलिसांवर संशय बळावला आहे. पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱया रोहिणीने पोलिसांवर संशय व्यक्त केला असून आपल्या वडिलांना खोटय़ा गुह्यांत अडकविल्याचाही आरोप केला आहे. शनिवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागाराबाहेर पत्रकारांशी बोलताना रोहिणीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वडिलांच्या मृत्यूला न्याय मिळेपर्यंत कायदेशीर लढाई सुरू ठेवणार असल्याचेही तिने सांगितले.
बसनगौडा यल्लनगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) यांना गांजा प्रकरणात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले होते. बेल्लद बागेवाडीहून बेळगावला येताना काकतीजवळ बसनगौडा यांना घाम आल्यामुळे स्थानिक खासगी इस्पितळात प्राथमिक उपचार करण्यात आले. थोडय़ा वेळाने त्यांना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नेण्यात आले. पोलिसांच्या या कृतीबद्दलही बसनगौडा यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.
काकतीजवळ जर बसनगौडा यांची प्रकृती बिघडली असेल तर वाटेत अनेक इस्पितळे आहेत. केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ, सिव्हिल हॉस्पिटलसह काही खासगी इस्पितळेही आहेत. एक तर आम्हाला वेळेत यासंबंधी माहिती देण्यात आली नाही. पोलिसांनीही चांगल्या इस्पितळात त्यांना दाखल केले नाही. आम्हाला वेळेत माहिती मिळाली असती तर आम्ही त्यांच्यावर उपचार केले असते. पोलिसांच्या छळामुळेच आपल्या वडिलांचा लॉकअपमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप रोहिणी हिने केला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून बसनगौडा यांची पत्नी व मुलीची भेट घेण्यासाठी पत्रकारांचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांना पत्रकारांसमोर आणण्यात आले नाही. शनिवारी दुपारी रोहिणी हिने आपली बाजू मांडली. माझ्या वडिलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास वडिलांचा फोन आला. ‘मी बाहेर चाललोय’, असे त्यांनी सांगितले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताना कुटुंबियांना माहिती द्यायला हवी होती. नियमानुसार नोटीस द्यायला हवी होती. कोणत्याच नियमांचे पालन करण्यात आले नाही.
रात्री बेळगावहून पोलिसांचा फोन आला. ‘तुम्ही शेजाऱयांना घेऊन तातडीने बेळगावला या’, असे अधिकाऱयांनी सांगितले. नेमके काय झाले आहे? याची माहिती देण्यात आली नाही. रात्री 10 वाजता आम्ही कुटुंबिय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो. त्यावेळी वडील बेडवर पडले होते. ते अद्याप जिवंत आहेत, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. आपण स्वतः पॅरामेडिकलचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे नाडी तपासून पाहिली. नाडी बंद पडली होती. शरीर थंड झाले होते. थोडय़ा वेळाने डॉक्टर आले आणि ‘तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे’, असे म्हणाले. आम्ही येथे येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे तर आम्हाला आधीच कल्पना का दिली नाही? असा प्रश्नही रोहिणीने उपस्थित केला.
आई, भाऊ आणि माझे आधार वडीलच होते. आम्हाला शिकायचे आहे. आमचे वडीलच गेले आता आम्हाला कोणाचा आधार? असा प्रश्न उपस्थित करून वडील जर एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात असते तर न्यायालयात त्याचा निकाल लागला असता. कोणत्याही गुह्यात नसताना त्यांना गोवण्यात आले आहे. ‘लॉकअप डेथ’मुळे आमचा आधार गेला आहे. आता आम्हाला कोण सांभाळणार? असा प्रश्नही रोहिणीने उपस्थित केला आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांवर रोहिणी पाटील या तरुणीने केलेल्या आरोपामुळे संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. एखाद्या व्यक्तीवर अटकेची कारवाई करताना त्याच्या कुटुंबियांना त्याची माहिती द्यायला हवी. या प्रकरणात पोलिसांनी तो नियम पाळला नाही. कुटुंबियांना न सांगता बसनगौडा यांना बेळगावला आणण्याची घाई का होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हात बांधून मारहाण?
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणल्यानंतर बसनगौडा यांचे हात दोरीने बांधून त्यांना मारहाण करण्यात आली का? असा संशय बळावला आहे. कारण शनिवारी दुपारी शवागाराबाहेर बसनगौडा यांच्या मुलीने गंभीर आरोप केला आहे. वडिलांचे दोन्ही हात दोरीने बांधल्याच्या खुणा दिसून येत होत्या. पोलिसांच्या छळामुळेच ही घटना घडल्याचे रोहिणी यांनी पत्रकारांना सांगितले. चौकशीनंतरच या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे.









