रवींद्रनाथ टागोर यांची दि. 8 मे रोजी जयंती. रवींद्रनाथ टागोर हे भारत देशातील पहिले महाकवी. ‘गीतांजली’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला जागतिक किर्तीचा ‘नोबेल’ हा सर्वात महत्वाचा पुरस्कार लाभला आणि हा पुरस्कार मिळविलेले ते केवळ फक्त भारतीय नव्हे तर पहिले आशियाई कवी ठरले.
वयाच्या साठीनंतर चित्रकलेत गुंतविले
टागोर यांना काव्यप्रतिभेचे देणे लाभले होते. साहित्यातले अनेक प्रकार त्यांनी यशस्वीरित्या हाताळले होते. आपल्या कवितांनी जसे त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले तसेच नाटक, कथा, कादंबरी आणि ललितगद्य या वाङ्मय प्रकारांनीही त्यांनी देशाबरोबर पाश्चिमात्यांचेही लक्ष वेधून घेतले. याचबरोबर चित्रकार म्हणूनही त्यांनी आपले एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व जगासमोर आणले होते. वयाच्या साठीनंतर त्यांनी चित्रकलेत स्वतःला गुंतवून ठेवले होते.
शिवाजी महाराजांचे व संतांचे कार्य बंगालमध्ये पोहोचविले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदेशाचे काम बंगालीमध्ये पोहोचविण्याचे कार्य, तसेच संत तुकारामांच्या अनेक अभंगांचे भाषांतर त्यांनी बंगालीमध्ये करून महाराष्ट्रातील संत परंपरेचे विचार बंगालात पोहचविले. एक थोर कवी, नाटककार, कादंबरीकार आणि कलोपासक म्हणून जसे ते आपल्या देशाला ज्ञात आहेत. त्याप्रमाणे एक थोर देशभक्त, समाजसुधारक म्हणूनही त्यांनी आपल्या जीवनकार्याचा ठसा उमटविला आहे. हे त्यांचे कार्य त्यांनी बंगालमध्ये ‘शांतीनिकेतन’ ही निसर्ग सान्निध्यात स्थापन केली आणि शिक्षणाच्या क्षेत्रात नवा प्रवाह आणला. आंतरभारतीची संकल्पना मांडली आणि आपला प्रवास विश्वमानव या तत्त्वाकडे नेला. संत ज्ञानेश्वर यांच्या ‘हे विश्वाची माझे घर’ या संकल्पनेशी त्यांचे कार्य मिळते.
लोकांना साहित्याचा लाभ होण्यासाठी कार्यरत
त्यांचे आचार विचार समाजाभिमुख होण्यास आणि पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्यावर बसण्यास बंगालामधील थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केलेल्या चळवळीस द्यावा लागेल. नवविचारांची परंपरा पुढे नेण्याची खुणगाठ त्यांनी तरुणवयातच बांधली होती. याशिवाय साहित्याचा, शांतीनिकेतन, आंतरभारतीचा लाभ जास्तीत जास्त लोकांना कसा होऊ शकेल. यासाठी कार्यरत राहिले.
मानवजातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत
प्रारंभीच्या काळात एक कवी, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ते नावारूपास आले आणि पुढे मग संवेदनशील चिंतक व चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आणि लोकमान्य टिळकांच्या तेजस्वी स्वातंत्र्यलढय़ाचे पुरस्कर्ते ही त्यांची रूपे प्रकर्षाने जनतेपुढे आली. महात्मा गांधीनीही शांतीनिकेतनला भेट देऊन रवींद्रनाथांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले होते. टागोर यांनी शब्दप्रभू बनून आपले कार्य मर्यादित ठेवले नाही तर मानवजातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते कार्यरत राहिले. अशा या महाकवीस, मानवतेच्या पुजाऱयास त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम.
शंभू भाऊ बांदेकर