प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील निर्लज्ज भाजप सरकारला गोवा मुक्तीसाठी सर्वस्व दिलेल्या हुतात्म्याबद्दल तसेच स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आदर नाही. लोहिया मैदानावरुन गायब झालेला डॉ. लोहियांचा पुतळा काल कंत्राटदाराच्या गोदामात सापडला. दुर्देवाने तेथील हुतात्मा स्मारक मात्र लोहिया मैदानावरच मातीत टाकून दिलेल्या अवस्थेत आहे.
सरकारने जर मातीत टाकून दिलेले हुतात्मा स्मारक येत्या 24 तासात सुरक्षित स्थळी हलविले नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते सदर पुण्यकार्य करतील असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिला आहे.
भाजप सरकार गोव्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्याचा वारंवार अपमान करीत आहे. भाजपचे बेगडी देश प्रेम यातुन उघड होत आहे असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
लोहिया मैदानावरील पुतळा तसेच हुतात्मा स्मारक व तेथील ऐतिहासीक नामफलक हे केवळ अधिकृत व तज्ञांच्या देखरेखीखाली व स्वातंत्र्य सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे श्री. चोडणकर यांनी म्हटले आहे.
आज दिवाळखोर झालेले भाजप सरकार ऐतिहासीक दस्तऐवज, पुतळे तसेच स्मारके क्रोनी क्लबला विकण्यासही मागे पुढे पाहणार नाही असा टोला गिरीश चोडणकर यांनी हाणला आहे.









