पश्चिम बंगालमध्ये एक अनोखी घटना घडल्याचे बोलले जात आहे. केवळ माणसांनी प्रवास करण्यासाठी असलेल्या लोकल टेनमधून एका घोडय़ाचाही प्रवास झाला आहे. या घोडय़ाने आपल्या मालकासह सीयालदह ते डायमंड हार्बर असा हा प्रवास केला. खरेतर घोडय़ावर बसून माणूस प्रवास करतो. पण आताच्या आधुनिक काळात घोडय़ांनाही माणसाबरोबर लोकलमधून प्रवास करण्याची वेळ येते.
घोडय़ाच्या या अनोख्या प्रवासाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. माणसांनी खचाखच भरलेल्या लोकलच्या डब्यातून घोडाही माणसांइतक्मया सहजतेने प्रवास करताना या छायाचित्रात दिसत आहे. ईस्टर्न रेल्वेने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही लोकल टेन ज्या स्टेशन्सवर थांबली, त्या प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांनी या घोडय़ाची छायाचित्रे घेतली आणि ती सोशल मिडियावरून व्हायरल करण्यात आली. घोडा लोकलच्या डब्यात चढताना पाहून प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी घोडय़ाच्या मालकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तथापि, मालकाने त्यांना जुमानले नाही आणि तो घोडय़ासह डब्यात घुसला. तेवढय़ातच गाडी सुरू झाल्याने प्रवाशांचाही नाईलाज झाला. 24 परगणा जिल्हय़ातील बरुईपूर येथे आयोजित एका शर्यतीत भाग घेण्यासाठी या घोडय़ाला नेण्यात येत होते. घोडय़ासाठी वेगळे वाहन करण्याऐवजी मालकाने हा स्वस्तातला पर्याय निवडला होता. आता चौकशीमध्ये ही घटना सिद्ध झाल्यास मालकाला जबर दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रवास त्याला महागात पडण्याची शक्मयता आहे.









