खासदार उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला
प्रतिनिधी/ सातारा
मी मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो. खासकरुन मुख्य न्यायमूर्तीना साकडं घालतो, साताऱयातील नगरसेवक बाळू खंदारे याच्यावर असलेल्या गुन्हय़ाबद्दल सुनावलेल्या जजमेंटचा पुनर्विचार करावा. नाहीतर अनर्थ होईल. मोक्कामधील गुन्हेगार जामीन घेण्यासाठी उद्यापासून राज्यातील न्यायालयात रांग लावतील. राज्यात गुन्हेगारी वाढेल. तेव्हा पोलीस आणि सरकारी वकिलांनाही काही करता येणार नाही, असे सांगत खासदार उदयनराजेंनी थेट सिस्टिमवरच नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी सुद्धा अशा गुन्हेगार लोकांना उमेदवारी देतात, निवडून आणतात, असा टोला नाव न घेता आमदार शिवेंद्रराजेंना लगावला. त्याचबरोबर माझ्यावरही खंडणीही केस टाकत अडकवण्याचा प्रयत्न केला होत, असे सांगत विधानपरिषद सभापती रामराजेंवरही त्यांनी टीका केली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, केवळ साताऱयापुरती बाब नाही. त्याचे परिणाम देशभरात होतील. लोकशाहीचा कायदा नियमावलीचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर तो न्याय मागण्यांसाठी पोलीस प्रशासन आणि सरकारी वकीलांकडे धाव घेतो. आपली फिर्याद नोंदवण्याकरता न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतो. परंतु अन्याय करणाऱयालाच पाठबळ दिले जाते. त्याच्याविरुद्ध तक्रार घेतली जात नाही. पीडितावर दबाव आणला जातो किंवा कसली तरी देवाणघेवाण होते, जखमी झालेल्यास कठोर सांगण्यात येते. मुख्य आरोपींची नावे त्यातून वगळण्यात येतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. अशामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. कुठे तरी पोलीस प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. आमदार, खासदार लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली वागणार असाल तर पीडितांनी दाद कोणाकडे मागायची. त्याला धमकावले जाते. त्याच्या जीविताला धोका असतो किंवा अपघात केस दाखवली जाते. लोकशाहीला हे मारक ठरणार आहे.
लोकप्रतिनिधी सुद्धा अशाच प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देतात आणि निवडून आणतात. पुन्हा ते मारहाण करतात. म्हणजे हा जंगल लॉ झाला आहे का. येथे ज्याची ताकद जास्त त्याचे चालणार माइट इज राईट असे होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारी वकील आणि पोलिसांनी एक समजून घ्यावे तुम्हीही समाजाचा एक भाग आहे. तुमच्यावर अशी वेळ आली तर काय कराल. एखाद्या कुठल्या व्यक्तीवर अन्याय झाला न्याय मिळवून देण्याचे काम झाले पाहिजे. परवा दिवशी या सातारा शहरात जिथं अनेक चळवळी निर्माण झाल्या तिथं घडलेला हा प्रकार आहे. ज्यांच्यावर 307, 397 दरोडा, बंदूक परवाना नसताना शस्त्र बाळगणे अशी कलम दाखल असताना अशा लोकांना बेल मिळतो. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली.
जजमेंटचा पुनर्विचार व्हावा
खासदार उदयनराजेंनी कोर्टाचे जजमेंट दाखवत हे मी बोलत नाही तर हे कोर्टाचे जजमेंट बोलत आहे. बाळू खंदारे बंदूक घेवून फिरतो. तरीदेखील सरकारी वकिलांचे मत असेल तर कशाला एवढी मोठी कलमे लागलेली आहेत ही विसंगती दिसून येते. मोक्यामध्ये महाराष्ट्रात जे गुन्हेगार आहेत ते उद्या साताऱयात असा प्रकार घडला आहे म्हणून न्यायालयात दाखवतील अन् मोक्क्यातील आरोपी मोकाट सुटतील. त्यामुळे मी हात जोडून न्यायव्यवस्थेला, महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना, सर्व मंत्र्यांना विनंती करतो, खास करून न्यायमूर्तींना साकडं घालतो याचा पूर्नविचार झाला नाही तर अनर्थ होईल, असे त्यांनी सांगितले.
काही नास्के असतात
पोलीस दल आणि सरकारी वकीलांमध्येही काही नास्के सुद्धा असतात. त्यामुळे पीडिताला न्याय मिळत नाही. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, याकरता चौकशी समितीमध्ये प्रमुख न्यायाधिश असला पाहिजे. कडक शासन मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.









