हॉटेल, धार्मिक स्थळे 8 जूननंतर खुली होणार : रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून पाचवा लॉकडाऊन जारी होणार असून राज्य सरकारने रविवारी नूतन मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार सोमवारपासून खुली होणारी हॉटेल, सर्व धर्माची प्रार्थना-पूजा स्थळे 8 जूननंतर खुली होणार आहेत. केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊन-5 ची जाहीर केलेली नियमावलीच राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या नियमात बदल केले आहेत.
राज्यभरात चित्रमंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच जून महिनाअखेरपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करू नयेत. तसेच शाळा चालू करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकारने कळविले आहे. त्याचबरोबर मंदिरे उघडण्याबाबत सोमवारी नूतन नियम जाहीर केले जाणार आहेत. यापूर्वीच्या निर्णयानुसार लग्नसोहळय़ाचे नियम कायम राहतील.
केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार राज्यातील रात्रीच्या वेळेतील कर्फ्युत शिथिलता आणण्यात येणार असून 30 जूनपर्यंत रात्री 9 पासून पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जारी करण्यात येणार आहे. तर मंदिराला संबंधित नियमांबाबत सरकार सोमवारी जाहीर करणार आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना अनुमती दिली जाणार आहे. तर सार्वजनिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक-धार्मिक बैठकांना परवानगी नाही. तसेच सार्वजनिक स्थळ, कार्यालयात प्रवेश करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसोहळय़ात 50 पेक्षा अधिक जणांनी भाग घेऊ नये. खासगी कंपनीमध्ये थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. तसेच परिसरात जंतूनाशक औषधाची फवारणी करावी. कार्यालयात कामावेळी सामाजिक अंतर ठेवावे, असे अनेक नियम सरकारने जारी केले आहेत.









