शेतकऱयांना लाखो रूपयांचा फटका
प्रतिनिधी / मडगाव
लॉकडाऊनच्या काळात सासष्टीत जर्सी गायींची चोरी होण्याचे प्रकार उघडकीस आले असून गायी चोरीला गेल्याच्या दोन तक्रारी मडगाव व मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात नोंद झाल्या आहेत. फार्ले-नावेली येथील टॉनी डिसिल्वा यांच्या मालकीच्या तीन तर उर्जो-कामुर्ली येथील मिंगेल फर्नांडिस यांच्या मालकीच्या तीन गायी मिळून सहा गायीची आत्ता पर्यंत चोरी उघडकीस आली आहे.
सद्या लॉकडाऊन सुरू असून गोव्याबाहेरून गुरांचे मास येत नसल्याने स्थानिक शेतकऱयांच्या गायी चोरून त्यांची कत्तल केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फार्ले-नावेली येथील टॉनी डिसिल्वा यांच्या मालकीच्या तीन गांभण गायीची चोरी करून त्यांची अज्ञातानाने कत्तल केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी त्यांनी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
या तीन गायीपैकी एक गाय दररोज दहा लिटर दूध देत होती तसेच या गायींची किंमत 80 हजार ते दिड लाख रूपयांपर्यंत होती अशी टॉनी डिसिल्वा यांनी दिली आहे. तीन गांभण गायी चोरीला गेल्याने, त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. या प्रकरणी त्यांनी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
दरम्यान, उर्जो-कामुर्ली येथील मिंगेल फर्नांडिस यांच्या तीन गायी चोरीला गेल्या असल्याची तक्रार त्यांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात नोंद केली आहे. या गायी सहा, पाच व चार वर्षाच्या होत्या. गोठय़ात बांधल्या ठिकाणाहून त्यांची चोरी झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. गायी गोठय़ातून गायब झाल्यानंतर आपण त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु, त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. नंतर या गायीची कत्तल केल्याचे आपल्याला कळून चुकल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फातोडर्य़ातून दोन बैलांची चोरी
सांतेमळ-राय येथील श्री सातेरी दूध सोसायटीचे चेअरमन दुर्गेश शिरोडकर यांच्या मालकीचे दोन बैल चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे बैल बांधून ठेवले नव्हते, चारा खाण्यासाठी त्यांना मोकळे सोडले होते. श्री. शिरोडकर यांनी ही या बैलांचा शोध घेतला परंतु ते सापडू शकलेले नाहीत.
दरम्यान, सासष्टीत लॉकडाऊनच्या काळात आणखीन काही शेतकऱयांची गुरे चोरीला गेली असून या गुरांची कत्तल केली असावी शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरांची चोरी करणारी एखादी टोळी कार्यरत असावी अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. फार्ले-नावेली येथील टॉनी डिसिल्वा यांनी आपल्या गायीची कत्तल करण्यात आलेल्या ठिकाणाचा शोध लावला असून त्या ठिकाणी त्यांना गायीची सोंड तसेच कातडी सापडली आहे. तसेच गुरांची हाडे देखील आढळून आली आहे. या गायीच्या चोरी मागे स्थानिकच गुंतल्याचा संशय असून पोलीस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.









