प्रतिनिधी/ खेड
दोन किलो सोन्याचे दागिने कमी किंमतीत देण्याचे आमीष देत खरेदीच्या व्यवहारासाठी गेलेल्या चौघांना चाकूचा धाक दाखवत 60 लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी येथील पोलीस पथकाने 5 जणांना रायगड जिल्हय़ातील म्हसळा येथे, तर एकास मंडणगड येथून जेरबंद केले. या 6 जणांकडून लुटीतील 2 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून एका कारसह पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या 6 जणांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य सूत्रधारासह अन्य 4 जण अजूनही फरारी असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार (सर्व म्हसळा), मनोज रमेश जाधव (मंडणगड), अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. अमर दिलीप जडय़ाळ (वासेवाडी-वेरळ) यास टोळीने दोन किलो सोन्याचे दागिने स्वस्तात देण्याचे आमीष दाखवले होते. ही बाब अन्य तीन मित्रांना सांगितल्यानंतर चौघांनी 60 लाखांच्या रोकडची जमवाजमव करत सोने खरेदीच्या व्यवहारासाठी गेले असता टोळीने चाकूचा धाक दाखवत सोने न देता 60 लाखांच्या रोकडसह पलायन केले होते.
फसवणुकीबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत विक्रम वसंत चव्हाण (दस्तुरी), सिद्धेश विठ्ठल पवार (सुकिवली) या दोघांना गजाआड करत दुचाकी जप्त केली होती. मुख्य सूत्रधारासह अन्य फरारींच्या शोधार्थ पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पथके रवाना झाली होती. दोन पथके मुंबई येथे तळ ठोकून होती.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांचे पथक रायगड जिल्हय़ात तपास करत असताना शास्त्रीय व तांत्रिक तपासाच्या आधारे टोळीतील काहीजण म्हसळा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. सर्वत्र जंगजंग पछाडूनही त्यांचा सुगावा लागत नव्हता. गोपनिय माहितीच्या आधारे टोळीतील एकाचा मोबाईलचा रिचार्ज संपला असल्याने तो कोणाशीही संपर्क साधू शकत नसल्याची बाब पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्या मोबाईलवर 50 रूपयांचा रिचार्ज मारला.
रिचार्ज मारल्यानंतर काहीवेळात त्याने भावाशी संपर्क साधला. याचदरम्यान, संशयित म्हसळय़ातील जंगलमय भागात लपून बसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस पथकाने पाचहीजणांना जेरबंद केले. मनोज जाधव यास मंडणगड येथे अटक करण्यात आली. या 6 जणांकडून 2 लाखांच्या रोकडसह कार व 5 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बांगर, पोलीस हवालदार विजय खामकर, शिवराज दिवाळे, पोलीस नाईक विरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई अजय कडू, रूपेश जोगी, साजिद नदाफ यांचा समावेश होता.
60 लाखांच्या लूटप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुख्य सूत्रधार असलेल्या किशोर पवार (हर्णे-दापोली) याच्यासह अन्य फरारींच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके वेगवेगळय़ा ठिकाणी रवाना झाली आहेत. मुख्य सूत्रधारासह फरारींना लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांनी व्यक्त केला…..