75 व्या स्वातंत्र्यदिनाची सज्जता पूर्ण -ऑलिम्पिक खेळाडूंच्या उपस्थितीचे आकर्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन रविवारी साजरा होत आहे. याच स्वातंत्र्यदिनापासून देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचा प्रारंभही होत आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रतिवर्षाच्या परंपरेनुसार देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. यावर्षीची विशेष परिस्थिती पाहता या दिनानिमित्त लाल किल्ला परिसरात बहुस्तरीय सुरक्षा स्थापित करण्यात आली आहे.
या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजी स्नायपर्सचा सहभाग असलेले सुरक्षा रिंगण, अत्युच्च प्रशिक्षित एसडब्ल्यूएटी कमांडोज पतंगरोधक (काईट कॅचर्स), कुशल नेमबाज आणि कॅनाईन युनिटस् यांचा उपयोग करण्यात येणार आहे. कुशल नेमबाजांना लाल किल्ला परिसराबाहेरच्या उंच इमारतींवर नियुक्त करण्यात येणार आहे. याशिवाय आकाशातून लक्ष ठेवणारी हेलिकॉप्टर्स व इतर सुरक्षा साधनसामुग्री स्थापित करण्यात आली आहे. या सुरक्षेचा सराव अनेकदा करण्यात आला आहे.
ड्रोन विरोधी यंत्रणा सज्ज
जम्मू-काश्मीर विमानतळावर तसेच काश्मीरमध्ये इतर ठिकाणी पाकिस्तानने ड्रोनच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत ड्रोन्स उडविण्यावर बंदी घालण्यात आली असून लाल किल्ला व त्याच्या आसपासच्या विभागांमध्ये ड्रोन विरोधी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 350 हून अधिक दीर्घ पल्ल्याचे सीसीटीव्ही कॅमेरे मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. ड्रोन विरोधी यंत्रणा प्रथमच उपयोगात आणली जाणार आहे.
कॅमेरा प्रतिमांवर सातत्याने लक्ष
स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आणि महनीय व्यक्ती त्यांच्या निवासस्थानी पोहोचेपर्यंत सीसीटीव्ही फुटेजवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. कोठेही काही संशयित हालचाल आढळून आल्याने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी गणतंत्रदिन कार्यक्रमाला शेतकरी आंदोलकांमध्ये घुसलेल्या समाजकंटकांनी गालबोट लावले होते. यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अत्याधिक दक्षता घेण्यात येत आहे. एकंदर सुरक्षा रक्षकांची संख्या 5000 हून अधिक असेल.
कंटेनर्सची भिंत
लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर यंदा प्रथमच जहाजांच्या कंटेनर्सची भिंत उभी करण्यात आली आहे. कोणत्याही अवांच्छनीय व्यक्तीला कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करता येऊ नये, यासाठी अभेद्य उपाययोजना करण्यात आली आहे. चांदनी चौक आणि त्या लगतच्या परिसरातून कोणालाही अनुमतीशिवाय लाल किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये, अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 70 हून अधिक पोलीस व्हॅन्स, ‘प्रखर’ व्हॅन्स आणि जलदगती दले नियुक्त करण्यात आली आहेत.
आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच यमुना नदी परिसरात यांत्रिक नावांच्या साहाय्याने पहारा ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाला गालबोट लागेल असा कोणताही प्रसंग घडू नये याची सर्व दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनाही सावधानतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमारेषांवर अतिदक्षता बाळगण्यात येत असून शेतकरी आंदोलकांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. दिल्लीतील सर्व हॉटेलांमध्ये कसून तपासणी होत आहे.
कार्यक्रमाची रंगीत तालीम
शुक्रवारी संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. भूदल, वायूदल आणि नौदलाच्या प्रशिक्षित सैनिकांचे संचलन घेण्यात आले. पतंग उडविणाऱयावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली रहदारी पोलिसांनी नियमावली प्रसिद्ध केली असून त्यानुसारच लोकांना वाहने चालवावी लागणार आहेत. अनेक रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली असून तेथील वाहतूक अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे. हे नियम पहाटे 4 पासून दुपारी 12 पर्यंत लागू राहणार आहेत. विजयघाट येथे काही ड्रोन्स ताब्यात घेण्यात आली आहेत.
अतिदक्ष सुरक्षा, कठोर नियम
कोरोना उद्रेक लक्षात घेऊन नियमावलीचे पालन अनिवार्य
कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱयांनी मास्क लावणे अनिवार्य
प्रेक्षकांची संख्या कमीतकमी राहणार, सामाजिक अंतर राखणार
कोणताही धोका होऊ नये यासाठी प्रशिक्षित सैनिकांचे कवच









