केवळ 100 जणांना किरकोळ त्रास : 1 लाख 91 हजार जणांना पहिला डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेले दहा महिने सुरू असलेले कोरोना साथीविरोधातील युद्ध जिंकून या नव्या रोगाला हद्दपार करण्याच्या महालसीकरण मोहिमेस देशभर शनिवारी सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील 1 लाख 91 हजार कोरोना योद्धय़ांना लसीची पहिली मात्रा टोचण्यात आली. या लसीकरण झालेल्यांपैकी कोणत्याही लाभार्थ्यांवर गंभीर विपरित परिणाम झाले नसल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. तथापि, काही जणांवर लसीचे किरकोळ स्वरुपात दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत.
लसीकरणानंतरच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत 52, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये 14-14, तेलंगणात 11 आणि ओडिशात 3 जणांना लसीचे साईड इफेक्ट झाल्याचे समोर आले. वेदना, चक्कर येणे, घाम येणे, छातीत जडपणा वाटणे अशा स्वरुपाचे त्रास लस घेणाऱयांना झाले असले तरी कोणाच्याही प्रकृतीवर गंभीर परिणाम झालेला नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी एकूण 1.91 लाख लोकांना लस देण्यात आली. तसेच लष्करातील 3,129 डॉक्टरांसह सर्व राज्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱयांनाही लस टोचण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. एकूण लाभार्थ्यांपैकी 100 म्हणजेच केवळ 0.05 टक्के लाभार्थ्यांना साईड इफेक्ट्स झाल्याचे दिसून आले.
देशात दिवसभरात 181 जणांचा मृत्यू
24 तासात 17 हजार 170 जण कोरोनामुक्त
देशात रविवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार अखेरच्या चोवीस तासात 181 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 17 हजार 170 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे 15 हजार 144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 5 लाख 57 हजार 985 झाली आहे, तर, सध्या देशात 2 लाख 8 हजार 826 सक्रिय रुग्ण असून, आजपर्यंत 1 कोटी 1 लाख 96 हजार 885 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 52 हजार 274 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमावावा लागल्याची माहिती रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.









