- लशीचा डोस घ्या आणि मोफत बिअर मिळावा
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. काही देशांमध्ये लसीकरण मोहिमेचे चांगले परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे लसीकरणात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी विविध प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. त्यातच आता अमेरिका सरकारने लसीकरणाचे प्रमाण वाढावे नागरिकांना भन्नाट ऑफर दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी ‘लशीचा डोस घ्या आणि बिअर मिळवा’ अशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता अमेरिकेतील जे नागरिक लस घेणार आहेत, अशा नागरिकांना मोफत बिअर दिली जाणार आहे.
दरम्यान, अमेरिकेत 4 जुलैच्या सुट्टीपर्यंत 70 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बायडन यांनी सांगितले की, मोफत बिअरची ऑफर ही लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी रोख रक्कम भेट, क्रीडा स्पर्धांची तिकिटे आदींसारख्या विविध प्रोत्साहनपर भेटवस्तूंच्या ऑफरसारखीच आहे. कोरोनापासून लवकरच आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या अमेरिकेत जवळपास 63 टक्के जणांनी कोरोना लशीचा किमान एक डोस घेतला आहे. अमेरिकेतील 12 राज्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक जणांना लस देण्यात आली असल्याचे बायडन यांनी सांगितले.
अमेरिकेत लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहे. लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी उबर व लिफ्टने मोफत प्रवास करता येणार आहे. लसीकरणामध्ये कृष्णवर्गीयांचा सहभाग कमी आहे. त्यामुळे त्यांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे व्हाइट हाउसच्या वतीने सांगण्यात आले.