रणरागिणींच्या वतीने म्हापसा येथे आंदोलन
प्रतिनिधी/ म्हापसा
मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची हत्या केली व तिच्या शरीराचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असताना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वषीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सुफियान या मुस्लीम युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे.
या केवळ एक-दोन घटना नसून गोव्यातही अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निर्घृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सुफियान यांना तत्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गोव्यात स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने म्हापसा पालिका बाजार प्रवेशद्वावर आंदोलनाद्वारे सरकारकडे करण्यात आली.
यावेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो!’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या!’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा!’ अशा घोषणाही देण्यात आल्या. हिंदू मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळय़ात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे, अशी अनेक गंभीर प्रकरणे यापूर्वी उघड झाली असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले.
या आंदोलनात शुभा सावंत(सनातन संस्था), राजश्री गडेकर(रणरागिणी शाखा), चंद्रिका पाडगावकर(शिक्षिका), रुपाली गवंडळकर(सामाजिक कार्यकर्त्या), अधिवक्त्या रोशन सामंत, जयेश थळी(मंदिर महासंघ) आदींसह इतरांनीही सहभाग घेतला होता.









